पश्चिम घाटातील जैवविविधता संकटात, काय आहे कारण?
गुजरातपासून केरळपर्यंतच्या समुद्र किनाऱ्यावर असलेल्या पश्चिम घाटातील जैवविविधता (Biodiversity) संकटात आहे. जंगल (Forest) परिसरातील वाढत्या अतिक्रमणांकडे शासन डोळेझाक करत आहे. लोकाग्रहास्तवाचा गाजावाजा करत घाट रस्ते बांधले जात आहेत. गर्द झाडी भुईसपाट करून खाणकाम केले जात आहे.
पर्यावरणाचे संतुलन बिघडवण्याचा ‘उद्योग’ बिनबोभाट सुरू आहे आणि शासन मात्र गांभीर्याने नोंद घ्यायला तयार नाही. पर्यटनासाठी पश्चिम घाटातील संवेदनशील गावे वगळण्याचा अट्टहास केला जात आहे. पश्चिम घाटात फिरताना समोर आलेले वास्तव विदारक आहे. पश्चिम घाट दुष्टचक्रात अडकला आहे… त्यावर प्रकाशझोत टाकणारी मालिका आजपासून…
कोल्हापूर जिल्ह्यातील गगनबावडा तालुका पश्चिम घाटात मोडणारा. कोल्हापुरातून कळे, साळवणमार्गे तालुक्यात प्रवेश करत मणदूरच्या रस्त्यावरून अणदूरचा तलाव गाठला. तालुक्यातील एक, दोन नव्हे, तर चोवीस गावे संवेदनशील क्षेत्रात (इको सेन्सिटिव्ह झोन) मोडणारी. त्यापैकी एक अणदूर. तेथील तलावाच्या चारी बाजूने बांधलेले फार्म हाऊस, हॉटेल, रेस्टॉरंटच्या इमारती दिसल्या.
जंगलाच्या कोअर भागात सुरू असलेला हा व्यवसाय त्यातून बाहेर पडणाऱ्या सांडपाण्याचे नियोजन काय? तेथपर्यंत पोहोचण्यासाठी डांबरी रस्ते झाल्याने वन्यजीवांचे काय? हे विचार पोखरू लागले. गगनबावडा जैवविविधतेने (Biodiversity)नटलेला तालुका. दुर्मिळ वनस्पती, पक्षी, प्राणी, सरीसृपांचे अस्तित्व. काय आहे येथील जंगलाची अवस्था पाहण्यासाठीच येथे गेल्यानंतर अगदी प्रारंभी अणदूर तलाव गाठला.
तलावाभोवती फेरफटका मारताना काही फार्म हाऊसचे बांधकाम सुरू असल्याचे दिसले. इतरांपेक्षा वेगळे फार्म हाऊस दिसावे, या अट्टहासापोटी तलावाच्या काठोकाठ बांधकाम केलेले दिसले. बेडरूममधून तलाव दिसला पाहिजे, अशा धाटणीचा इमारतीचा आराखडा. स्थानिक गावकऱ्यांशी संवाद साधल्यानंतर धनदांडग्यांनी दाट जंगलात जमिनी खरेदी केल्याची माहिती पुढे आली.
‘तुमचे गाव इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये आहे ना? या प्रश्नावर ‘ते काय असतंय?’ असा त्यांनीच प्रतिप्रश्न विचारला. ‘वन्यप्राणी दिसतात का तुम्हाला?,’ या प्रश्नावर ‘तलावाच्या काठावर गवा, काळवीट, गेळा, बिबट्यांसह अन्य प्राणी पाणी पिण्यासाठी यायचं. गवं कधी कधी येऊन शेतीचं नुकसान करत्यात. बाकीचं प्राणी दिसत नाहीत. तलावाचं पाणी प्रदूषित झाल्यावर ती तर कशाला येतील? तलावाचं पाणी गावकरी पित होतं. आता कोण नाही पित,’ ही त्यांची थेट प्रतिक्रिया.
‘त्यो समोरचा डोंगर दिसतूय का? त्याच्यावर लोकांनी घर बांधल्यात,’ त्यातील एकाने बोटाने डोंगर दाखवला. ‘औषधी वनस्पतींसाठी कोणही जंगलात येतंय. जंगलातील लय झाडं तोडल्यात. मध, शिकेकाई, हिरडा, आमसूल, बेहडाची झाडं कमी झाल्यात. सहजी मिळणाऱ्या रानमेव्यासाठी जंगल पालथं घालाय लागतंय,’ पोटतिडकीने ते सांगत होते.
त्यांचा निरोप घेऊन अणदूरहून गगनबावड्याचा रस्ता धरला. रस्त्याच्या दुतर्फा फार्म हाऊसच्या इमारती दिसत होत्या. रस्त्याच्या कडेला प्लास्टिक पिशव्या, बाटल्या जागोजागी पडलेल्या होत्या. कचऱ्याच्या ढिगांना आग लावल्याचे दिसत होते आणि त्यातून बाहेर पडणारा धूर प्रदूषणात भर घालत होता. ओल्या पार्ट्यांच्या निमित्ताने आलेल्यांकडून प्लास्टिक पत्रावळ्या, द्रोण रस्त्यावरच टाकल्याचे दिसत होते. गगनबावड्यापर्यंत तीच स्थिती कायम होती.
गगनबावड्यात काही स्थानिकांना भेटल्यानंतर जागेच्या दराबाबत विचारणा केली असता, ते अस्वस्थ झाले. ‘गरजेसाठी, शिक्षण आणि नोकरीसाठी, तर काहीवेळा चैनीसाठी विक्री केलेल्या जमिनीचे भाव आता गगनाला भिडले आहेत. स्वतःच्या मालकीच्या जमिनीवर कामगार म्हणून राहण्याची वेळ मूळ मालकांवर आली आहे. गावातील एजंटांनी कमिशनसाठी गावच बड्या धेंडांच्या दावणीला बांधण्याचा उद्योग चालवला आहे. जंगल कमी होत आहे, त्याचे कोणाला सोयरसूतक नाही,’ असे सांगताना त्यांची नजर कोरडी बनली होती. (क्रमशः)
अणदूर तलावातून पंचक्रोशीतील गावकऱ्यांना पिण्याच्या पाण्याचा पुरवठा होतो. अलीकडील काही वर्षांत त्याच्या काठावर हॉटेल थाटली गेली आहेत. तेथून बाहेर पडणारे सांडपाणी तलावात मिसळू नये म्हणून काहीही उपाययोजना केल्याचे दिसत नाही. हॉटेल बांधण्यासाठी बांधकाम परवानगी देणारी ग्रामपंचायत काय करते? जंगलाच्या मध्य भागात अशा बांधकामांना परवानगी कशी आणि का दिली जाते? वन विभाग याकडे गांभीर्याने कधी पाहणार की नाही?
– डॉ. मधुकर बाचूळकर, पर्यावरण तज्ज्ञ
अशी आहे सद्यस्थिती
वन्यजीवांच्या भ्रमण मार्गांवर लोकांचे अतिक्रमण
वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीत शिरकाव
जंगल परिसरात प्लास्टिक पिशव्या, बाटल्यांचा खच
रस्ते रुंदीकरणासाठी ठिकठिकाणी वृक्षतोड
न कुजणारा प्लास्टिक कचरा थेट शेतात
प्रदूषणामुळे जैवविविधता धोक्यात
रानमेव्यांच्या उत्पादनावर मर्यादा
तालुक्यातील तलावांचे प्रदूषण
दुर्मिळ वनस्पती, पशू, पक्षी, प्राण्यांच्या अस्तित्वाला धोका
दृष्टिक्षेपात
जगभरातील १७ देशांत जैवविविधता
भारतात सर्वात मोठी जैवविविधता
देशाच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी २०.६० टक्के क्षेत्र वनाच्छादित
दरवर्षी १३ कोटी मीटर वेगाने वृक्षाच्छादन नष्ट
देशातील ४५ पेक्षा अधिक प्रजाती नामशेष
जगभरात १५० हून अधिक प्रमुख पिकांच्या जाती व हजारो जंगली वाण संकटात
जगभरात ३४ हॉटस्पॉट
१९४७ ला जंगलाचे प्रमाण ६८ टक्के
सद्यस्थितीत जंगलाचे प्रमाण ३५ ते ३६ टक्के
इको सेन्सिटिव्ह झोनमध्ये ६ राज्ये, ४८८ गावे
पश्चिम घाटात १२० नद्यांचा उगम