कोल्हापुरात आरोग्य विज्ञान विद्यापीठ उपकेंद्रासाठी 3 एकर जागा उपलब्ध करा : अजित पवार
कोल्हापूर येथील आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या उपकेंद्रासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय परिसरात तीन एकर जमीन (land) उपलब्ध करा, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. मंत्रालयात गुरुवारी आयोजित केलेल्या बैठकीत ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री पवार म्हणाले, कोल्हापूर परिसरासह दक्षिण महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांना आरोग्य विज्ञान विषयातील पदवी आणि पदविका अभ्यासक्रम उपलब्ध झाले पाहिजेत. याद़ृष्टीने महाराष्ट्र या उपकेंद्रास जागा देणे महत्त्वाचे आहे. जागा निश्चितीसाठी पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाहणी करण्याच्या सूचनाही त्यांनी जिल्हाधिकार्यांना दिल्या.
उपकेंद्राला जमीन (land) मिळाल्यास कोल्हापूर परिसरातील विद्यार्थ्यांसाठी विविध अभ्यासक्रम सुरू करता येतील. तसेच आरोग्य विज्ञान विद्यापीठाशी संबंधित अधिकारी व कर्मचार्यांना विद्यापीठ कामासाठी वारंवार नाशिकला जाण्याची गरज राहणार नाही. वैद्यकीय शिक्षणमंत्री, जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता यांनी संयुक्त पाहणी करून जागा निश्चित करावी. ही जागा योग्य नसल्यास अन्य पर्यायी जागेची उपलब्धता करून द्यावी, अशी सूचनाही त्यांनी केली.
या बैठकीस वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, आमदार ऋतुराज पाटील, आमदार जयश्री जाधव आदी प्रत्यक्ष उपस्थित होते. तर दूरदृश्यप्रणालीद्वारे महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू माधुरी कानिटकर, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डी. टी. शिर्के, जिल्हाधिकारी राहुल रेखावार उपस्थित होते.