कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्गास लवकरच प्रारंभ
कोल्हापूर-वैभववाडी रेल्वेमार्ग (Railroad) गती शक्ती योजनेतून केला जाणार आहे. त्याचा अंतिम सर्व्हे झाला असून अंतिम आराखडाही सादर केला आहे. यामुळे लवकरच या मार्गाच्या कामाला प्रारंभ होणार आहे. मुंबईत बुधवारी मध्य रेल्वे सरव्यवस्थापक नरेश लालवाणी यांच्या अध्यक्षतेखाली प्रवासी सल्लागार समितीची बैठक झाली. या बैठकीत या मार्गाबाबत सूतोवाच करण्यात आले. मिरज-वैभववाडी दुहेरीकरणाबाबतही बैठकीत चर्चा झाली.
खासदार धनंजय महाडिक यांनी कोल्हापूर-वैभववाडी रेल्वे मार्गासह कोल्हापूर-पुणे व कोल्हापूर-सोलापूर मार्गावर इंटरसिटी सुरू करा, कोल्हापूर-मुंबई सह्याद्री एक्स्प्रेस सुरू करा आदी मागण्या केल्या. यावेळी कोल्हापूर-वैभववाडी मार्गाचे अंतिम सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. या मार्गाचा अंतिम डीपीआर तयार झाला असून तो सादरही केला आहे. हा मार्ग पंतप्रधान गती शक्ती योजनेतून केला जाणार असून आता केवळ निधी उपलब्ध होण्याची प्रतीक्षा असल्याचे यावेळी रेल्वेकडून सांगण्यात आले.
कोल्हापूर-मिरजऐवजी मिरज-वैभववाडी दुहेरीकरणाची मागणी
बैठकीत कोल्हापूर-मिरज रेल्वेमार्गाच्या (Railroad) दुहेरीकरणाची मागणी करण्यात आली. मात्र, या मार्गाबाबत ‘रेट ऑफ रिटर्न्स’ उणे आहे. यामुळे यासाठी निधी मिळण्याची शक्यता नाही. याउलट मिरज-कोल्हापूर-वैभववाडी या मार्गासाठी ‘रेट ऑफ रिटनर्स’ चांगला आहे. त्याला निधीही असल्याचे रेल्वेच्या वतीने सांगण्यात आले. त्यानुसार मिरज-वैभववाडी दुहेरीकरणाची मागणी केली जाणार आहे.
मुंबईत सध्या सुरू असलेल्या प्लॅटफॉर्मचे काम पूर्ण झाल्यानंतर सह्याद्री एक्स्प्रेसचा विचार केला जाईल, असेही यावेळी सांगण्यात आले. पुणे-मिरज मार्गाच्या दुहेरीकरणाचे काम मार्च 2023 पर्यंत पूर्ण होईल. यानंतरच कोल्हापुरातून आणखी नव्या गाड्या सोडणे शक्य असल्याचेही सांगण्यात आले. यावेळी कोल्हापूर-मुंबई वंदे भारत एक्स्प्रेसबाबतही चर्चा करण्यात आली.
कोल्हापूर-मुंबई महालक्ष्मी एक्स्प्रेसच्या डब्यांची संख्या वाढवण्यासह त्याला एलएचबी कोच जोडण्याबाबत साऊथ सेंट्रल रेल्वेशी चर्चा करून निर्णय घेतला जाईल, असेही सांगण्यात आले. या बैठकीला खासदार अरविंद सावंत, खासदार जयसिद्धेश्वर स्वामी, कोल्हापूरचे शिवनाथ बियाणी आदी उपस्थित होते.