कोल्हापूर क्रीडानगरीच्या नावलौकिकाला गालबोट

शतकी परंपरा लाभलेल्या क्रीडानगरीच्या नावलौकिकाला भ्रष्टाचाराचे (corruption) गालबोट लागले आहे. खुद्द जिल्हा क्रीडा अधिकारी डॉ. चंद्रशेखर साखरे यांना 1 लाख 10 हजारांची लाच घेताना रंगेहाथ पकडल्यानंतर एकूणच क्रीडा विभागाचा भ्रष्ट कारभार चव्हाट्यावर आला आहे. यामुळेच केवळ डॉ. साखरे यांचीच नव्हे, तर संपूर्ण महाराष्ट्रातील क्रीडा अधिकार्‍यांच्या चौकशीची मागणी क्रीडाप्रेमी संस्था-संघटनांकडून करण्यात आली आहे.

शंभर वर्षांपूर्वी राजर्षी शाहू महाराज यांनी कोल्हापुरात क्रीडानगरीचा भक्कम पाया निर्माण केला. यावर विकासाची शिखरे चढविण्याऐवजी क्रीडा क्षेत्र खिळखिळे करण्याचे काम भ्रष्ट अधिकारी-कर्मचारी, काही राजकारण्यांकडून केले जात असल्याचे वास्तव आहे. राजर्षी शाहू, छत्रपती राजाराम महाराज, छत्रपती शहाजी महाराज यांच्या दूरद़ृष्टीने कोल्हापुरात क्रीडा क्षेत्र विकसित झाले. किंबहुना, त्यांच्या कारकिर्दीत उभारलेल्या मैदान, स्टेडियमवरच आजही इथल्या खेळाडूंची भिस्त आहे. क्रीडाप्रेमी लोकांच्या प्रोत्साहन-पाठबळामुळे पारंपरिक व अत्याधुनिक खेळातही शेकडो खेळाडू घडत असून, ते राज्य-राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय स्पर्धा गाजवत आहेत.

क्रीडा विकासाच्या योजना अपुर्‍या

दुसरीकडे, खेळाडू घडविण्यासाठी शासनातर्फे स्वतंत्र क्रीडा विभाग, गलेलठ्ठ पगाराचे क्रीडा अधिकारी, प्रशिक्षकांची नेमणूक केली आहे. विविध योजनांतर्गत कोट्यवधी रुपयांचा निधीही दरवर्षी दिला जातो. मात्र, क्रीडा विकासाच्या बहुतांशी योजना अर्धवट व अपुर्‍या असल्याचे वास्तव आहे. छत्रपती संभाजीनगर विभागीय क्रीडा संकुल, खासबाग कुस्ती मैदान, छत्रपती शिवाजी स्टेडियम, मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमसह विविध तालुका क्रीडा संकुले, जलतरण तलाव याची ज्वलंत उदाहरणे आहेत. नव्या योजना राहू देत, जुन्यांची देखभाल-दुरुस्तीही व्यवस्थित होत नसल्याचे वास्तव आहे. विभागीय क्रीडा संकुलाचे काम तब्बल 20 वर्षे सुरू असूनही ते पूर्णपणे आजही वापरात आलेले नाही. जलतरण तलावासह विविध मैदानांसाठी केलेला कोट्यवधींचा खर्च वाया गेला आहे. यासाठी दोषी असणार्‍यांवर कारवाई करण्याऐवजी नव्या योजना आखून त्यासाठी पुन्हा कोट्यवधींच्या निधीची मागणी अधिकार्‍यांकडून केली जात आहे.

संबंधित घटकांची मिलीभगत

कोल्हापूरच्या क्रीडा संकुल उभारणीच्या कामात झालेल्या कोट्यवधीच्या भ्रष्टाचाराचा (corruption) पाढा विविध संघटनांनी आंदोलनाच्या माध्यमातून राज्यकर्त्यांसमोर मांडूनही याबाबत कोणावरही अद्याप कार्यवाही झालेली नाही. यामुळे संबंधित सर्व घटकांची मिलीभगत असल्याचा आरोप आंदोलकांकडून केला जात आहे. खेळ स्पर्धांच्या आयोजनातही भ्रष्ट अधिकारी हात मारत आहेत. अनेक पंच, प्रशिक्षक, खेळाडू यांचे अनेक वर्षांपासून मानधन थकीत आहे. याशिवाय खेळाडूंच्या प्रमाणपत्रांची पडताळणी असो, व्यायामशाळा उभारणी असो, खेळ साहित्य पुरवठा असो, अंतर्गत बांधकामे-डागडुजी असो, संस्थांना अनुदानाची उपलब्धता असो किंवा स्पर्धा आयोजन असो, अशा प्रत्येक गोष्टीत भ्रष्टाचार्‍यांची साखळी सक्रिय असते. त्यांच्याकडून खेळाडू व त्यांच्या पालकांना विविध प्रकारे त्रास दिला जातो. या साखळीची गोपनीय चौकशी करून संबंधित अधिकारी-कर्मचारी यांच्या मालमत्तांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही क्रीडाप्रेमी संस्था-संघटनांच्या वतीने करण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *