पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकार परिषदेत दिली ‘ही’ ग्वाही
पालकमंत्री म्हणून आपल्याला दहा महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. या कालावधीत कोल्हापूरची हद्दवाढ (limit increase) केली जाईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. अलमट्टीप्रश्नी प्रसंगी आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला.
पालकमंत्री म्हणून नियुक्ती झाल्यानंतर शुक्रवारी मुश्रीफ यांचे कोल्हापुरात आगमन झाले. शासकीय विश्रामगृहावर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना मुश्रीफ म्हणाले, पालकमंत्री म्हणून निवड झाली. पण कालावधी कमी आहे. तशाच मर्यादाही आहेत. यामुळे लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत, त्या पूर्ण करण्यासाठी कठोर परिश्रम घेतले जाईल. 20 वर्षे मंत्री म्हणून, काही जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून केलेले काम याचा मोठा अनुभव पाठीशी आहे. यामुळे प्रलंबित प्रश्नांना गती देऊ व ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करू, असे त्यांनी सांगितले.
कोल्हापूरच्या हद्दवाढीला (limit increase) अग्रक्रम दिलाच पाहिजे, असे सांगत मुश्रीफ म्हणाले, किमान कोल्हापूर शहरालगतच्या गावांचा प्रश्न सोडवावा लागेल. पहिल्या टप्प्यात जी गावे शहराला लागून आहेत, त्यांचा समावेश करून शहराची हद्दवाढ येत्या दहा महिन्यात केली जाईल. याखेरीज कोल्हापूरचा तीर्थक्षेत्र विकास, पंचगंगा प्रदूषण विकासासाठी प्रयत्न केला जाईल. शाहू मिल येथे शाहू स्मारक, सर्किट बेंच हे प्रश्न दीर्घकालीन आहेत. त्यासह विविध विकासकामांसाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले.
तीन पक्षांना विश्वासात घेतले जाईल. विरोधी पक्षालाही न्याय दिला जाईल. कोणाचीही तक्रार येणार नाही, असे काम करू, असे सांगत मुश्रीफ म्हणाले, जिल्हा नियोजन समितीत निधी वाटपात कोणावरही अन्याय केला जाणार नाही. निधी वाटपाचे तीन पक्ष आणि विरोधी पक्ष यांचे सूत्र ठरले आहे. त्यानुसार कार्यवाही केली जाईल. जिल्हा नियोजन समितीच्या आपल्या पक्षाच्या सदस्यपदाच्या रिक्त जागांवर लवकरच नियुक्ती केली जाईल. तीनही पक्षाच्या जिल्हाध्यक्ष, प्रमुख पदाधिकार्यांची बैठकही घेतली जाईल. समन्वयाद्वारे विविध समित्यावरील नियुक्त्या करून कार्यकर्त्यांना संधी दिली जाईल, असेही त्यांनी सांगितले. अलमट्टी धरणाची उंची वाढवण्याचा घाट कर्नाटक सरकारने घातला आहे.
याबाबत विचारता ते म्हणाले, उंची वाढवल्यास कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मोठे नुकसान होणार आहे. कर्नाटकातीलही अनेक गावांना त्याचा फटका बसणार आहे. यामुळे याबाबत मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्याशी चर्चा करून, त्यांना कर्नाटकचे मुख्यमंत्री, जलसंपदा मंत्री यांच्याशीही चर्चा करण्यासह हा निर्णय मागे घेण्यास सांगू. त्यानंतरही निर्णय झाला नाही तर प्रसंगी याविरोधात आंदोलन उभे करू, असा इशाराही त्यांनी दिला.
मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, हे ‘त्यांना’ चांगले वाटले नसावे
भाजपच्या मेहरबानीने मुश्रीफ पालकमंत्री झाले. त्यांच्याशी संघर्ष कायमच राहील, या भाजपचे समरजित घाटगे यांच्या वक्तव्यावर मुश्रीफ म्हणाले, काही वर्षांपूर्वी काँग्रेसमधून लोक भाजपत गेले. राष्ट्रवादीतून गेले, शिवसेनेतून गेले. अजित पवार गटानेही भाजपला पाठिंबा दिला. 5 जुलै रोजी अजित पवार यांनी भूमिका मांडताना राज्याच्या विकासासाठी आणि पक्षाच्या विस्तारासाठी तसेच गेल्या काही वर्षांत पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या कामांमुळे ते पुन्हा पंतप्रधान व्हावेत याकरिता आम्ही पाठिंबा दिल्याचे सांगितले. मोदी पुन्हा पंतप्रधान व्हावेत, ते त्यांना चांगले वाटत नसावे. हे त्यांचे दु:ख, वेदना, यातना आहेत. त्या मी समजू शकतो. पण, त्याला नाईलाज आहे. त्याला परमेश्वरच औषध देऊ शकतो, अशा शब्दांत घाटगे यांचे नाव न घेता त्यांना प्रत्युत्तर दिले. लोकसभा, विधानसभा निवडणुकीत समजेल मुश्रीफ किती प्रामाणिक आहे, असेही त्यांनी सांगितले.