सीपीआरने खरेदी केली 96 लाख रुपयांची कोलेस्टोमी किटस्?
सार्वजनिक आरोग्याच्या क्षेत्रामध्ये काम करणार्या आणि अभ्यासही करणार्यांचे डोळे पांढरे व्हावेत, असा उद्योग जिल्हा नियोजन मंडळाच्या विकास निधीतून सीपीआरसाठी केलेल्या खरेदीमध्ये केला आहे. सर्वसाधारणपणे सीपीआर रुग्णालयासाठी (hospital) गेल्या 5 वर्षांमध्ये राज्य सरकारकडून औषधे, सर्जिकल साहित्य व उपकरणे यासाठी उपलब्ध होणारा निधी तपासला, तर शीर्ष 21 अंतर्गत वर्षाला 4 ते 5 कोटी रुपयांचा निधी मिळतानाही कसरत करावी लागते.
यातून सर्जिकल ड्रेसिंग किती रुपयांचे खरेदी केली जाते? पण जिल्हा नियोजन व विकास मंडळाकडून उपलब्ध झालेल्या निधीवर या बहाद्दरांनी अशा काही कुर्हाडी चालविल्या, की साडेसात कोटी रुपयांचे सर्जिकल ड्रेसिंग खरेदी झाले. याखेरीज कोलेस्टोमी किटस्, सीटी स्कॅनसाठी लागणार्या सिरिंजिस, डाय, अतिदक्षता विभागात रुग्णांसाठी उपयोगात आणणारे डबल आणि ट्रिपल ल्युमेन कॅथेटर यांच्या बाजारात उपलब्ध असलेल्या किमती आणि प्रत्यक्ष खरेदी करण्यात आलेला दर यांचा ताळमेळ घातला, तर मेंदू सुन्न होऊ शकतो.
रुग्णाच्या मलनिस्सारणाच्या वाटेमध्ये अडथळा निर्माण झाला, तर मोठ्या आतड्यापासून नवी वाट करण्याची शस्त्रक्रिया केली जाते. त्याला कोलेस्टोमी म्हणतात. या शस्त्रक्रियेसाठी कोलेस्टोमी किट वापरले जाते. शहरातील अत्यंत प्रतिष्ठित रुग्णालयातही या शस्त्रक्रियेसाठी वापरण्यात येणार्या किटस्ची किंमत 325 रुपयांपेक्षा अधिक नाही. सीपीआर रुग्णालयात (hospital) अशा प्रकारे वर्षाकाठी केल्या जाणार्या शस्त्रक्रियांची सरासरी संख्या 100 पेक्षा अधिक नाही, पण खरेदी कंपूने एका किटस्साठी तब्बल 9 हजार 617 रुपये मोजले आहेत आणि खरेदीही एक हजार किटस्ची करण्यात आली. आता 96 लाख 17 हजार रुपयांच्या या किटस्द्वारे कोणाच्या वाटा बायपास करायच्या आहेत, याचे उत्तर द्यावे लागणार आहे.
डबल ल्युमेन आणि ट्रिपल ल्युमेन कॅथेटरची खरेदीही अशाच प्रकारची आहे. 1200 रुपयाला बाजारात उपलब्ध असलेला डबल ल्युमेन कॅथेटर 3 हजार रुपयाला, तर 2 हजार रुपयांना उपलब्ध असलेला ट्रिपल ल्युमेन कॅथेटर 4 हजार रुपयाला, या कॅथेटरवर दीड कोटी रुपये उधळले आहेत. सरासरी 10 रुपयाला मिळणारा सलाईन सेट प्रतिसेट 24 रुपयाने खरेदी केला. ही खरेदी 90 हजार सेटस्ची आहे. त्याची किंमत 21 लाख 60 हजार रुपये इतकी आहे.
सीटी स्कॅनसाठी आयोहेक्झॉल नावाचा कॉन्ट्रास मीडिया वापरला जातो. या कॉन्ट्रास मीडियाच्या 300, 320 आणि 350 अशा स्ट्रेंथ (ताकद) आहेत. बाजारात 350 स्ट्रेंथच्या 100 मिलिलिटर आयोहेक्झॉलची बाटली 1 हजार 200 रुपयाला उपलब्ध आहे. तेथे सीपीआरची खरेदी 2 हजार 310 रुपयांची आणि ज्या 320 स्ट्रेंथच्या 100 मिलिलिटर आयोहेक्झॉलची बाटली हजार रुपयात मिळते, त्याची खरेदी तब्बल 3 हजार 960 रुपयांनी केली आहे. नवजात अर्भकाच्या फुफ्फुसांची वाढ अनियमित असेल, तर सरफॅक्टंट नावाचे इंजेक्शन वापरले जाते. भारतातील विख्यात कंपनीचे हे इंजेक्शन 3 हजार 790 रुपयाला उपलब्ध आहे. सीपीआरमधील खरेदी मात्र 8 हजार 336 रुपये 5 पैसे या दराने झाली आहे. किती उदाहरणे द्यावीत. शस्त्रक्रियेसाठी वापरल्या जाणार्या धाग्यांची खरेदी कोट्यवधी रुपयांत आहे आणि त्याचे दरही बाजारापेक्षा चढे आहेतच. शिवाय, ही खरेदी किती वर्षांसाठीची आहे, याचा पत्ता लागत नाही.