आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी केली महत्त्वाची घोषणा
महात्मा फुले आरोग्य जीवनदायी योजनेतून पाच लाख रुपयांपर्यंतचे उपचार (treatment) करण्याच्या योजनेची अंमलबजावणी दसर्यापासून सुरू होईल, अशी घोषणा आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी रविवारी केली. धर्मादाय संघटना महाराष्ट्र राज्य यांच्यामार्फत कोल्हापुरात महाआरोग्य शिबिर आयोजित केले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मंत्री सावंत म्हणाले, गेल्या वर्षभरात आरोग्य विभागात महत्त्वाचे 22 निर्णय घेतले आहेत. त्याची अंंमलबजावणी सुरू करण्याच्या द़ृष्टीने सध्या प्रक्रिया सुरू आहे. महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून पाच लाखांपर्यंतचे उपचार (treatment) करण्याची महत्त्वाची योजना जाहीर केली आहे. त्याचा शासन आदेशही झाला आहे. काही तांत्रिक बाबींची पूर्तता करून या योजनेची अंमलबजावणी सुरू होईल.
राज्यातल्या कोणत्याही सरकारी रुग्णालयात औषधे कमी पडू देणार नाही. राज्य सरकारकडून तसेच प्रत्येक जिल्ह्याच्या नियोजन समितीतून औषधे मोठ्या प्रमाणात उपलब्ध करून दिली जातात. त्यामुळे कोणीही आरोग्यसेवेबाबत राजकारण करू नये. कोरोना काळात ज्यांनी देवदूत म्हणून काम केले, त्यांना कोणीही आरोपीच्या पिंजर्यात उभा करण्याचा प्रयत्न करू नये. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतीच पत्रकार परिषद घेऊन अनेक गंभीर आरोप केले आहेत. त्या सर्व प्रश्नांची सडतोड उत्तरे उद्या सोमवारी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन करणार असल्याचेही सावंत यांनी सांगितले.