अंबाबाई मंदिराच्या परिसरात तणावाचे वातावरण
अंबाबाई मंदिराच्या दक्षिण दरवाजानजीकची चप्पल स्टँड काढण्यावरून महापालिका अतिक्रमण विभाग (Encroachment Department) आणि चप्पल स्टँडधारकांत धक्काबुक्कीचा प्रकार घडला. पोलिस बंदोबस्तात जेसीबीच्या मदतीने मंदिराच्या भिंतीलगतची चप्पल स्टँड हटविण्यात आली. कोणतीही पूर्वसूचना न देता कारवाई केल्याचा आरोप स्टँडधारकांनी केला. कारवाईवेळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. झटापटीत एक महिलाही किरकोळ जखमी झाली.
देवस्थान समितीच्या वतीने इंदुमती हायस्कूलनजीक मोफत चप्पल सेवा केंद्र सुुरू करण्यात आले आहे. तर दक्षिण दरवाजानजीक अंबाबाई मंदिर भिंतीलगतची खासगी चप्पल स्टँड काढण्यावरून अनेक दिवसांपासून धुसफूस सुरू आहे. मंगळवारी महापालिका अतिक्रमण विभागाने (Encroachment Department) येथील चप्पल स्टँड हटविण्याचा निर्णय घेतला. जेसीबी, डंपर, ट्रॅक्टरट्रॉलीसह कर्मचारी याठिकाणी दाखल झाले.
दगडावर डोके आदळण्याचा प्रयत्न
महापालिका अतिक्रमण विभागाचे कर्मचारी व जुना राजवाडा पोलिसांचा फौजफाटा याठिकाणी चप्पल स्टँड काढण्यासाठी दाखल झाला. चप्पल स्टँडधारक गणेश पाखरे, जीवन पाखरे, प्रकाश कोरवी यांनी पर्यायी जागा मिळेपर्यंत स्टँड काढू नका, अशी भूमिका घेतली. यावेळी येथे जमलेल्या महिला आणि महापालिका कर्मचार्यांमध्ये वाद झाला. एका महिलेने दगडावर डोके आदळून घेण्याचाही प्रयत्न केला.
जागेवरच ठिय्या
केबिन हटविल्यानंतरही चप्पल स्टँडधारकांनी जागा सोडण्यास नकार दिला. भर उन्हात हे केबिनधारक रस्त्यावर ठिय्या मांडून होते. हा प्रकार पाहणार्या भाविकांचाही काही काळ गोंधळ उडाला.
चप्पल स्टँडची बाब न्यायालयात
चप्पल स्टँडधारकांनी यापूर्वीही अनेकदा याबाबत न्यायालयात धाव घेतली आहे. महापालिकेने मंगळवारी केलेली कारवाई एकतर्फी असल्याचा आरोप चप्पल स्टँड धारक करत होते. तसेच आम्हाला पर्यायी व्यवस्था देईपर्यंत केबिन काढू नये, असेही ते सांगत होते.
पोलिस बंदोबस्तात केबिन हटविल्या
महिला पोलिसांनी चप्पल स्टँड काढण्यास विरोध करणार्या महिलांना बाजूला केले. यावेळी आरडाओरड व गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. पोलिसांनी विरोध करणार्यांना बाजूला करताच महापालिकेने सर्व केबिन बाजूला करत डंपरमध्ये भरल्या.