मराठा समाजाच्या वतीने सरकारला इशारा; मुदतीत आरक्षण मिळाले नाही तर…
मराठा आरक्षण (reservation) देण्यासाठी सरकारने एक महिन्याची मुदत मागितली होती. ही मुदत 24 ऑक्टोबरला संपत असून मुदतीत आरक्षण मिळाले नाही तर सरकारला सळो की पळो करून सोडू,असा इशारा सकल मराठा समाजाच्या वतीने मंगळवारी देण्यात आला. मिरजकर तिकटी येथे आरक्षणाच्या मागणीसाठी जेल भरो आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी आंदोलकांनी हा इशारा दिला. या आंदोलनामुळे मिरजकर तिकटी आणि परिसरातील वाहतूक सुमारे अर्धा तास विस्कळीत झाली. एक मराठा लाख मराठा, मराठ्यांना आरक्षण मिळालेच पाहिजे अशा घोषणा देत कार्यकर्त्यांनी हा परिसर दणाणून सोडला. अखेर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, आंदोलनाचा पुढील टप्पा म्हणून शनिवारी (दि. 14) शाहू स्मारक येथे वकिलांची परिषद घेण्यात येणार असल्याचे यावेळी आंदोलकांनी जाहीर केले.
मराठा आरक्षणाच्या (reservation) मागणीसाठी मंगळवारी जेल भरो आंदोलन करण्याची हाक सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली होती. त्यानुसार सकाळी 11 पासून कार्यकर्ते मिरजकर तिकटी चौकात एकत्र जमू लागले. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनीही कडेकोट बंदोबस्त ठेवला होता. दुपारी बाराच्या सुमारास घोषणाबाजी करत आंदोलनाला सुरुवात झाली. दिलीप देसाई म्हणाले, मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी नेमलेल्या उपसमितीचे मंत्री चंद्रकांत पाटील हे अध्यक्ष असून त्यांना या प्रक्रियेतून सरकार सतत डावलत आहे. गेल्या सहा महिन्यापासून असे प्रकार सुरू आहेत. मुख्यमंत्र्यांनी हिम्मत असेल तर त्यांचा राजीनामा घ्यावा. विजय देवणे म्हणाले, केंद्रात आणि राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार आहे. तरीदेखील आरक्षण देण्याचा निर्णय होऊ शकलेला नाही.
महाराष्ट्रातील सर्व पक्षाच्या खासदारांनी एकत्र येऊन यासंदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर दबाव आणला पाहिजे. तरच आरक्षणाचा हा तिढा सुटणार आहे. बाबा पार्टे म्हणाले, 24 ऑक्टोबरपर्यंत मराठा समाज शांततेने आंदोलन करेल. सरकारच्या निर्णयाची वाट पाहील. पण मुदतीत आरक्षण मिळाले नाही तर मात्र सरकारला सळो की पळो करून सोडू. आदिल फरास म्हणाले, मराठा हा बहुजनांचा मोठा भाऊ आहे. त्यामुळे या समाजावर होणारा अन्याय आम्ही खपवून घेणार नाही. सरकारने आरक्षण देण्याचा निर्णय तत्काळ घ्यावा. आर. के. पोवार म्हणाले, मराठा समाज गेल्या अनेक वर्षांपासून आरक्षणासाठी लढत आहे. त्यामुळे त्यांना न्याय दिला पाहिजे.
या आंदोलनात शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पवार, अॅड. बाबा इंदुलकर, महादेव पाटील, जयकुमार शिंदे, किसन कल्याणकर, अमरसिंह निंबाळकर, अनिल घाटगे, निलेश लाड, जाफर मुजावर, सुनीता पाटील, वैशाली महाडिक, चंद्रकांत भोसले, चंद्रकांत पाटील आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते.