…तर रक्ताच्या नद्या वाहतील; पालकमंत्री मुश्रीफ यांना इशारा, 18 गावांचा बंद

सुळकूडचे पाणी इचलकरंजीला देत नाही, त्यासाठी रक्ताचे पाट वाहणार असतील तर हद्दवाढीविरोधात रक्ताच्या नद्या वाहतील, असा इशारा शहरालगतच्या 18 गावांनी गुरुवारी पालकमंत्री (Guardian Minister) हसन मुश्रीफ यांना दिला. हद्दवाढविरोधात 18 गावांनी कडकडीत बंद पाळला. ग्रामस्थांशी चर्चा करा, संवाद साधा, असे सांगत हद्दवाढ लादणार असाल तर उग्र आंदोलन होईल, असाही इशारा यावेळी देण्यात आला.

आठ महिन्यांत कोल्हापूरची हद्दवाढ केली जाईल. त्यात शहरालगतच्या गावांचा पहिल्या टप्प्यात समावेश केला जाईल, असे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले होते. त्याविरोधात 18 गावांत आज कडकडीत बंद पाळण्यात आला. ठिकठिकाणी निदर्शने करण्यात आली. सभा घेऊन ग्रामस्थांनी हद्दवाढीला विरोध दर्शवला. या गावचे सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना निवेदन दिले. यावेळी ग्रामस्थांनी आक्रमक भूमिका मांडली.

पालकमंत्री (Guardian Minister) सुळकूडचे पाणी इचलकरंजीला देत नाहीत. आपल्या मतदारसंघावर अन्याय होऊ नये म्हणून दुसर्‍या भागावर अन्याय करतात. त्यांना आमच्या कल्याणाची काळजी करण्याची गरज काय? तुमचा मतदारसंघ जपताय, तुमचे वोट पॅकेट जपताय आणि ग्रामीण भागावर अन्याय का करता, असा सवालही यावेळी करण्यात आला. महापालिकेची परिस्थिती काय आहे? उपनगरातील वीज, पाणी, रस्त्यांची अत्यंत वाईट परिस्थिती आहे. प्राधिकरण स्थापन झाले होते, त्यावेळी दोन हजार कोटी रुपये देतो, असे तत्कालीन पालकमंत्र्यांनी आश्वासन दिले होते. दोन रुपयांचेही काम 18 गावांत झालेले नाही. अशा परिस्थितीत प्राधिकरणात आम्हाला ढकलून मोकळ्या जागा बेलामूपणे आरक्षण टाकून हडप केल्या जात आहेत. हद्दवाढ झाली तर आमची ना घर का ना घाट अशी अवस्था होईल, असेही यावेळी सांगण्यात आले.

यावेळी वडणगेचे माजी सरपंच सचिन चौगले, उचगावचे सरपंच मधुकर चव्हाण, पाचगावच्या सरपंच प्रियंका पाटील, संग्राम पाटील, शिंगणापूरच्या सरपंच रसिका पाटील, उजळाईवाडीचे सरपंच उत्तम आंबवडे, वळीवडेच्या सरपंच रूपाली कुसाळे, उचगावचे दीपक रेडेकर आदींनी भूमिका मांडली. जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनावर वडणगेच्या सरपंच संगीता पाटील, शिरोलीच्या सरपंच पद्मजा करपे, मुडशिंगीच्या सरपंच अश्विनी शिरगावे, सरनोबतवाडीच्या सरपंच शुभांगी आडसुळ, कळंब्याच्या सरपंच सुमन गुरव, मोरेवाडीचे सरपंच ए. व्ही. कांबळे, गोकुळ शिरगावचे सरपंच चंद्रकांत डावरे, नवे बालिंगाच्या सरपंच पूजा जांभळे, आंबेवाडीच्या सरपंच सुनंदा पाटील, शियेच्या सरपंच शीतल मगदूम, गांधीनगरचे सरपंच संदीप पाटोळे, नागदेववाडीचे सरपंच रवींद्र पोतदार, वाडीपीरचे सरपंच संदीप मिठारी, नागावचे सरपंच विमल शिंदे मुडशिंगीचे उपसरपंच तानाजी पाटील, आदींसह ग्रामस्थांच्या स्वाक्षर्‍या आहेत.

जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातील मुद्दे

हद्दवाढीबाबत चर्चा करा. ग्रामपंचायतींना शासनाच्या विविध योजनांतून कोट्यवधींचा निधी मिळतो, त्यामुळे गावांचा सुनियोजित विकास सुरू आहे. शहरात समावेश होणे हा गावांवर होणार अन्याय आहे. ग्रामपंचायतीत जनतेची कामे वेगाने व कमी वेळात होतात. शहरात दिरंगाई होते, नागरिकांना हेलपाटे मारावे लागणार. शहराचाच विकास झालेला नाही तर प्रस्तावित गावांचा विकास कसा होणार. ग्रामीण भागातील जमीनी हडप करण्याचा डाव आहे. हद्दवाढ झाल्यास मुळशी पॅटर्नसारखी स्थिती होऊन शेतकरी देशोधडीला लागण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *