राज्य सरकारही कंत्राटी पद्धतीने चालवा : राजू शेट्टी
सरकार जर सर्वच गोष्टी कंत्राटी पद्धतीने करणार असेल, तर राज्य सरकार (state government) देखील कंत्राटी पद्धतीने चालवा, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री पद देखील कंत्राटी पद्धतीने भरा, अशी टीका शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी राज्य सरकारवर गुरुवारी केली.
विविध मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेतर्फे जिल्ह्यात जनआक्रोश पदयात्रा आयोजित केली आहे. ती सात नोव्हेंबरपर्यंत चालणार आहे. त्याची सुरुवात शेट्टी यांच्याहस्ते येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास अभिवादन करून झाली. त्याप्रसंगी ते माध्यमांशी बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश खराडे उपस्थित होते. यात्रेत पोपट मोरे, संदीप राजोबा, संजय बेले, भागवत जाधव आदी सहभागी झाले आहेत.
राजू शेट्टी म्हणाले, सर्वसामान्य जनतेकडून कोट्यवधींचा कर सरकार गोळा करत असेल आणि सगळ्या गोष्टी जर कंत्राटी पद्धतीने करणार असेल, तर आम्ही कर देखील का भरावा? साखरसम्राटांकडून आम्ही दर मिळविल्याशिवाय गप्प बसणार नाही. ही यात्रा 22 दिवसांची व 600 किलोमीटरची आहे. 22 मुक्काम आणि दररोज 25 किलोमीटर अंतर चालण्यात येणार आहे. ही यात्रा जिल्ह्यातील सर्व साखर कारखाने, तालुक्यांची ठिकाणे व प्रमुख गावांतून जाणार आहे. तेथून येथील गणपती मंदिर येथे गणरायाला साकडे घालून यात्रा गणपती पेठ, स्टेशन चौक, पुष्पराज चौक, विश्रामबाग मार्गे मिरजेकडे ही रथयात्रा रवाना झाली.
बेडगमार्गे उद्या मोहनराव शिंदे कारखाना येथे जाणार आहे. त्यानंतर एरंडोली, शिपूर, सलगरे, कोंगनोळी, हिंगणगावमार्गे महांकाली कारखान्यावर 15 रोजी यात्रा पोहोचेल. त्यानंतर शिरढोण, बोरगाव, योगेवाडी, कुमठे, कवठेएकंद, तासगाव, मणेराजुरी, गव्हाण, अंजनी, सावळज, बस्तवडे, बलगवडे, आरवडे, मांजर्डे, मोराळे, पेड, हातनूर, विसापूर, बोरगाव, पानमळेवाडी, लिंब, आळते, मंगरूळमार्गे उदगिरी कारखान्यावर दि. 22 रोजी पोहोचणार आहे.
पारे, विटा, घानवड, गार्डीमार्गे नागेवाडी कारखान्यावर दि. 23 रोजी पोहोचणार आहे. डोंगराई रायगाव कारखान्यावर नेवरी, कडेपूरमार्गे दि. 26 रोजी दुपारी दोन वाजता जाणार आहे. तेथून ही यात्रा सोनहिरा कारखान्यावर कडेगाव, तडसरमार्गे दि. 27 रोजी पाच वाजता पोहोचणार आहे. बलवडी, तुरचीमार्गे ही यात्रा तासगाव कारखान्यावर दि. 29 रोजी पाच वाजता जाईल.
स्वाभिमानी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व साखर कारखान्यांवर पदयात्रा काढणार आहे. दोन्ही पदयात्रा क्रांती कारखान्यावर एक नोव्हेंबर रोजी येणार आहेत. त्यानंतर दोन्ही जिल्ह्यांतील हजारो कार्यकर्ते, शेतकरी हुतात्मा, वसंतदादा कारखानामार्गे सर्वोदय कारखान्यावरून पुन्हा कोल्हापूर जिल्ह्यात प्रवेश करणार आहेत.
या आहेत मागण्या…
* यंदा उसाला वाढीव खर्चानुसार प्रतिटन 5000 रुपये भाव मिळावा
* दुधाला 60 रुपये हमीभाव द्या
* वजन-काटे ऑनलाईन करावेत
* तोडणीसाठी द्यावे लागणारे पैसे बंद करा
* साखर उतार्यातील चोरी थांबवा
* द्राक्ष, बेदाणा महामंडळ स्थापन करा
* दलालांची नोंदणी सुरू करा
* डाळिंब आणि द्राक्षावर प्रक्रिया उद्योग सुरू करा