पहिल्या टप्प्यात हद्दवाढीत चार गावांचा समावेश : पालकमंत्री हसन मुश्रीफ
कोल्हापूर शहराची हद्दवाढ अपरिहार्य आहे. त्यामुळे हद्दवाढ (limit increase) होणारच, असे स्पष्ट करत पहिल्या टप्प्यात शहरालगतच्या चार गावांचा समावेश केला जाईल, असे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत सांगितले. हद्दवाढीविरोधात असलेल्या गावांचे मतपरिवर्तन केले जाईल. याकरिता दसर्यानंतर या गावांच्या बैठका घेऊ, असेही त्यांनी सांगितले.
हद्दवाढीविरोधात शहराजवळच्या 18 गावांत गुरुवारी कडकडीत बंद पाळण्यात आला. याबाबत विचारता पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, पुण्यासह अन्य शहरात समावेश होण्यासाठी त्यालगतच्या गावांची स्पर्धा सुरू आहे. मात्र कोल्हापुरात हद्दवाढीसाठी विरोध केला जात आहे. या गावांतील नागरिकांना हद्दवाढीचे फायदे समजावून सांगणे गरजेचे आहे. त्यांना हद्दवाढीच्या प्रवाहात आणण्यासाठी त्यांचे मतपरिवर्तन करणे गरजेचे आहे. त्यासाठी त्यांची मते जाणून घेऊ. दसरा झाला की या गावांची बैठक घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले.
शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय केंद्राच्या विविध योजनांचा लाभ मिळणार नाही, असे सांगत मुश्रीफ म्हणाले, कोल्हापूर शहराची हद्दवाढ करून जगातील उत्कृष्ट शहर बनविण्याचे आपले स्वप्न आहे. कोल्हापूर शहर हे जिल्ह्याची अस्मिता आहे. त्यामुळे हद्दवाढ (limit increase) करून शहराचा विकास करण्याची गरज आहे. यामुळे शहरातील सेवा-सुविधांचा लाभ घेणार्या लगतच्या चार गावांचा तरी हद्दवाढीत समावेश केला जाईल, असेही त्यांनी सांगितले.
इचलकरंजी शहराला दिवसातून दोन वेळा स्वच्छ व मुबलक पाणी दिले जाणार आहे. त्यासाठी कृष्णा नदीतून पुरवठा केला जाईल, असे सांगत मुश्रीफ म्हणाले, दूधगंगा धरणात उन्हाळ्यात पाणीटंचाई जाणवते. यावर्षी पिण्यासाठीही पाणी नव्हते. शेतकर्यांना पिकांसाठी बोअर मारावे लागले. इचलकरंजीला मजरेवाडीतून कृष्णा नदीचे स्वच्छ पाणी दिले जाईल, असे त्यांनी सांगितले.
खासदार संजय राऊत यांनी तीन दिवसांत सरकार कोसळेल असे भाकीत केले आहे. यावर विचारता मुश्रीफ म्हणाले, मला माहीत नाही की संजय राऊत यांची भविष्यवाणी कोणती आहे. पण महायुतीचे सरकार कार्यकाल पूर्ण करणार आहे आणि पुन्हा सत्तेत येऊन तिसर्यांदा नरेंद्र मोदी पंतप्रधान होतील, असेही त्यांनी सप्ट केले.
सुप्रिया सुळेंच्या विरोधात अजित पवार प्रचार करणार
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी लोकसभा निवडणुकीत बारामतीची जागा भाजपला जिंकायची आहे, असे वक्तव्य केले आहे. खा. सुप्रिया सुळेंच्या विरोधात उपमुख्यमंत्री अजित पवार प्रचार करणार का, असा प्रश्न पत्रकारांनी उपस्थित केला. यावर मुश्रीफ म्हणाले, उपमुख्यमंत्री अजित पवार हे खा. सुळेंच्या विरोधात प्रचार करतील. महायुतीचेच सरकार येणार असून पंतप्रधान मोदीच होणार असल्याचे त्यांनी सांगितले.