सीपीआर घोटाळाप्रकरणी दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई
सीपीआरमधील सेवा-सुविधांसाठी उपलब्ध झालेल्या निधीवर डल्ला मारत केलेल्या घोटाळ्याचा (Scam) पर्दाफाश केला आहे. सीपीआरच्या या घोटाळ्याची गंभीर दखल राज्याचे वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतली आहे. याप्रकरणी चौकशी समिती नेमण्यात येणार असून, यामध्ये दोषी आढळणार्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे मुश्रीफ यांनी सांगितले.
‘सार्वजनिक निधीवर दरोडा’ अशी वृत्तमालिका प्रसिद्ध करण्यात आली. सहा भागांच्या या वृत्तमालिकेत सीपीआरमधील साहित्य खरेदीत कसा गैरप्रकार झाला, यावर प्रकाशझोत टाकण्यात आला. जिल्हा नियोजन मंडळाच्या निधीतून करण्यात येणार्या खरेदीचे निकष कसे बदलण्यात आले, हृदयशस्त्रक्रिया विभागात लाखोंची अनावश्यक खरेदी कशी झाली, उपाहारगृहाचे नियमबाह्य कंत्राट, मनुष्यबळ पुरवठ्याचे बेकायदेशीर ठेके, 96 लाख रुपयांची कोलेस्टोमी किटस् खरेदी, सर्जिकल ड्रेसिंग खरेदीत पाडलेला ढपला आदी विविध गैरप्रकारांद्वारे सीपीआरमध्ये झालेला घोटाळा (Scam) उघड करण्यात आला आहे.
या वृत्तमालिकेची पालकमंत्री मुश्रीफ यांनी दखल घेतली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी केली जाईल. याकरिता लवकरच चौकशी समिती नेमली जाईल. चौकशीदरम्यान या प्रकरणातील सर्व सत्य बाहेर काढले जाईल. यामध्ये जे जे दोषी आढळतील, त्या त्या सर्वांवर कठोर कारवाई केली जाईल. या प्रकरणात कोणाचीही हयगय केली जाणार नाही, असेही मुश्रीफ यांनी स्पष्ट केले.