ईशा केसकरचं दमदार पुनरागमन, कोल्हापुरात शूटिंग सुरू
लक्ष्मीच्या पाऊलांनी या मालिकेतून प्रसिद्ध अभिनेत्री ईशा केसकर (actress) छोट्या पडद्यावर दमदार कमबॅक करणार आहे. कला खरे ही भूमिका ती साकारतेय. एका वेगळ्या रुपात ईशा प्रेक्षकांच्या भेटीस येईल.
स्टार प्रवाहसोबतची पहिली मालिका साकारण्यासाठी ईशा प्रचंड उत्सुक आहे. या मालिकेविषयी सांगताना ईशा म्हणाली, ‘सध्या सगळीकडेच नवरात्रौत्सवाची धामधूम सुरु आहे. अशा या मंगलमय वातावरणात लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेचा प्रोमो येतोय ही खूप भारावून टाकणारी गोष्ट आहे. या मालिकेत मी कला खरे ही भूमिका साकारत आहे. नावाप्रमाणेच कला एक उत्तम कलाकार आहे. तिला हातकाम, रंगकला आणि चित्रकलेची आवड आहे. ती देवीची मूर्ती आणि दागिने घडवते.’
अंबाबाईच्या देवळाबाहेर कलाचं दागिन्यांचं दुकान आहे. ती स्वतःच्या हाताने सर्व पारंपरिक दागिने अगदी मनापासून बनवते. संपूर्ण कोल्हापूर शहरात तिने बनवलेले दागिने प्रसिद्ध आहेत. सर्वसामान्य आयुष्य जगणाऱ्या कलाला गरीब-श्रीमंत असा भेद केलेला आवडत नाही. हे पात्र प्रत्येकाला आपलसं वाटेल असं आहे. आजवर माझ्या प्रत्येक भूमिकेवर प्रेक्षकांनी प्रेम केलं आहे. हेच प्रेम कला आणि आमच्या लक्ष्मीच्या पाऊलांनी मालिकेलाही मिळेल याची खात्री आहे. मालिकेत अनेक दिग्गज कलाकारांसोबत काम करण्याची संधी मिळतेय. किशोरी अंबिये माझ्या आईची भूमिका साकारत आहेत. किशोरी ताईंसोबत याआधीही काम केलं आहे. त्यामुळे सीन्स खूप छान होत आहेत. कोल्हापूरातल्या अनेक प्रसिद्ध ठिकाणी आम्ही सध्या शूट करत आहोत. मालिका सुरु होण्यापूर्वीच कोल्हापुरकरांचं भरभरुन प्रेम मिळत आहे अश्या शब्दात ईशाने (actress) आपली भावना व्यक्त केली.
लक्ष्मीच्या पाऊलांनी २० नोव्हेंबरपासून भेटीला येतेय.