कोल्हापूर जिल्ह्यात राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय
कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगडमध्ये राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय (Divisional Office) सुरू करण्यास राज्य सरकारने मान्यता दिली आहे. सहकार व पणन विभागाने याबाबतचा शासन निर्णय (जीआर) जारी केला आहे.
महाराष्ट्रातील काजू फळ पिकाच्या विकासासाठी राज्य सरकारने मे महिन्यात काजू मंडळाची स्थापना केली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखालील या मंडळाचे मुख्यालय नवी मुंबईतील वाशी येथे तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात विभागीय कार्यालये स्थापन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मात्र, कोल्हापूर जिल्ह्यातील चंदगड आणि आजरा तालुक्यातील काजू फळ पिकाचे उत्पादन विचारात घेता राज्य काजू मंडळाचे विभागीय कार्यालय (Divisional Office) चंदगड येथेही स्थापन करण्याची मागणी करण्यात येत होती. त्यानुसार चंदगड येथेही विभागीय कार्यालय सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे.
राज्यात उत्पादित काजूचा स्वतंत्र ब्रँड तयार करून त्याला ‘जीआय’ मानांकन मिळवून देणे, काजूची निर्यात वाढवणे, देशांतर्गत काजू व्यापाराला चालना देणे, काजू प्रक्रिया उद्योग उभारणे यासह काजू उद्योगातून उपपदार्थ तयार करण्याच्या उद्देशाने राज्य काजू मंडळाची स्थापना करण्यात आली आहे. कोकणातील ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा व चंदगड तालुके असे कार्यक्षेत्र या मंडळासाठी निश्चित करण्यात आले आहे. या मंडळासाठी 50 कोटींचे भागभांडवलही राज्य सरकारने घोषित केले आहे.