भाविकांच्या अलोट गर्दीत अंबाबाईचा पालखी सोहळा एक अभूतपूर्व क्षण
पोलिस बँडची धून… पायघड्या… रांगोळ्यांची आरास… फुलांनी सजलेली पालखी आणि ‘अंबामाता की जय’ अशा जयघोषात अंबाबाईचा पालखी सोहळा (Palkhi ceremony) झाला. रविवारी रात्री दहाच्या सुमारास पालखीचे पूजन होऊन पालखी सोहळा सुरू झाला. मंदिराच्या सभोवती भाविकांची अलोट गर्दी होती. फुलांची उधळण करत करवीरवासीयांनी देवीचे रूप नयनांत साठवले.
घटस्थापनेपासून करवीरनिवासिनी अंबाबाईच्या नवरात्रौत्सवाला प्रारंभ झाला. नवरात्रौत्सवातील देवीचा पालखी सोहळा (Palkhi ceremony) हा एक अभूतपूर्व क्षण मानला जातो. गारेच्या गणपतीसमोर उभारलेल्या मंडपामध्ये राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर व वैशाली क्षीरसागर यांच्या हस्ते पालखीचे पूजन करण्यात आले. पालखी दत्त मंदिर, घाटी दरवाजा, रामाचा पार, शनी मंदिर, नगारखान्यासमोरून पुन्हा गारेच्या गणपतीसमोरील मंडपामध्ये आली. मंदिराच्या सभोवती थांबलेल्या भाविकांनी पालखीवर फुलांची उधळण करत देवीचे दर्शन घेतले. रात्री उशिरापर्यंत मंदिरात भाविकांची गर्दी होती.