कोल्हापूरात महावीर काॅलेजसमोर हृदय पिळवटून टाकणारा आक्रोश

मद्यधुंद चालकाने बुधवारी रात्री साडेदहा वाजता बेदरकारपणे कार चालवीत गजबजलेल्या महावीर कॉलेज चौकात दोन मोटारींसह पाच दुचाकी, अशा सात वाहनांना चिरडले. जीएसटी विभागाची एसयूव्ही कार अंदाधुंदपणे चालविणार्‍या मद्यपी चालकाचे नाव ऋषीकेश कोतेकर असे आहे. या भीषण अपघातात (accident) वरुण रवी कोरडे (वय 22, रा. प्लॉट नं. 4, बिल्डिंग क्र. 3, उदयसिंगनगर, महावीर महाविद्यालयाजवळ) या तरुण बॅडमिंटनपटूचा जागीच करुण अंत झाला. या अपघातात नऊजण जखमी झाले असून, यापैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यांच्यावर खासगी रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. रात्री साडेदहाच्या सुमारास मद्यपी चालकाने भरधाव वाहन दामटल्याने महावीर कॉलेजच्या प्रवेशद्वारात सात वाहनांना धडक दिल्याने रस्त्यावर रक्त आणि काचांचा सडा पडला होता. या विचित्र अपघाताने कोल्हापूर शहर हादरले.

या अपघातप्रकरणी मद्यधुंद अवस्थेत चारचाकी चालवत असलेला चालक ऋषिकेश बाबुराव कोतेकर (वय 29, रा. बुवा चौक, शिवाजी पेठ) याला जमावाने बेदम चोप देऊन पोलिसांनी ताब्यात दिले. रात्री उशीरापर्यंत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती.

जीएसटी विभागाकडे असलेली चारचाकी (एमएच-10 ईए-9495) घेवून कोतेकर भरधाव वेगाने कसबा बावड्याकडून महावीर महाविद्यालयाच्या दिशेने गाडी उडवत येत होता. यावेळी त्याने रमणमळा ते मेरी वेदर मैदान दरम्यान दोन दुचाकींना धडक (accident) दिली. धडक दिल्यानंतर त्याने चारचाकीचा वेग आणखी वाढवला. त्याच वेगात तो महावीर कॉलेज चौकात आला. याच वेळी बॅडमींटन खेळून वरूण जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्लेझर मोपेडवरून (एमएच-09 बीएन 9173) घराकडे जात होता. महावीर चौकात कोतेकरने वरूणच्या मोपेडला जोरदार धडक दिली. या धडकेची तीव्रता एवढी होती की वरुणची मोपेड सुमारे पंधरा ते वीस फुट उंच हवेत उडाली. वरूण रस्त्यावर कोसळला. त्याचवेळी त्याच्या डोक्यावर चारचाकीचे चाक गेल्याने तो जागीच ठार झाला. कवटी फुटल्याने रस्त्यावर मेंदू विखुरला होता.

वरुणला धडक दिल्यानंतर कोतेकरचे नियंत्रण सुटले आणि जयंती नाल्याकडून कसबा बावड्याच्या दिशेने रस्त्याच्या विरूध्द बाजूने जाणार्‍या दोन चारचाकी व पाच दुचाकींना त्यांने अक्षरश चिरडत नेले. त्यामुळे कोतेकर चालवत असलेली चारचाकी दोन वेळा पलटी होऊन पुन्हा सरळ झाली.

मद्यधुंद कोतेकरला जमावाने चोपले

क्षणभर काय घडले हेच कुणाला कळेनासे झाले. रस्त्यावर वरूण निपचित पडला होता. घटनास्थळी नागरिकांची प्रचंड गर्दी झाली. जमावाने कोतेकरला गाडीतून बाहेर काढून बेदम चोप दिला. दुर्घटनेची माहिती मिळताच शाहुपुरी पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळी अपघातग्रस्त वाहने, जखमी आणि नागरिकांची प्रचंड गर्दी असल्याने पोलिसांनी दोन्ही बाजूची वाहतूक बंद केली.बघ्याची गर्दी हटवण्यासाठी पोलिसांनी किरकोळ लाठीमारही करावा लागला.

दरम्यान वरूणचा मृतदेह पोलिसांनी सीपीआर रुग्णालयात आणला. वरूणची मोपेड पाहून त्याचे मित्र सीपीआरमध्ये आले, यानंतर त्याचे आई-वडील आणि मामा, काका असे नातेवाईक आले. मामांनी मृतदेह ओळखला. यानंतर नातेवाईकांनी केलेला आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.

उत्कृष्ट बॅडमींटनपट्टू

वरूण उत्कृष्ट बॅडमींटनपट्टू होता. दररोज सायंकाळी तो बॅडमींटन खेळण्यासाठी जात होता. आजही तो नेहमीप्रमाणे बॅडमींटन खेळून घराकडे जाताना काळाने त्याच्यावर घाला घातला. वरूण कसबा बावड्यातील अभियांत्रिकी महाविद्यालयात डाटा सायन्स विभागाच्या अखेरच्या वर्षांचे शिक्षण घेत होता. त्याच्या मागे आई वडील आणि बहीण आहे. बहीण सध्या बंगळूर येथे असून तिलाही या अपघाताची माहिती देण्यात आली आहे.

अंगावर शहारे आणणारे दृश

अपघातस्थळावरचे दृश अंगावर शहारे आणणारे होते. संपूर्ण रस्त्यावर चक्काचूर झालेल्या पाच दुचाकी आणि तीन चारचाकी होत्या. संपूर्ण परिसरात काचांच खच पडला होता. ठिकठिकाणी रक्ताचा सडा पडला होता. काही जखमी वेदनेने विव्हळत होते. किती वाहने चिरडली, किती जखमी, कोण कोण आहेत, याची नेमकी माहिती मिळत नसल्याने परिसरातही आपल्या तर ओळखीचे कोणी नसावे या भितीने काहींची गाळण उडाली होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *