‘गोकुळ’कडून दूध उत्पादकांना दिवाळी भेट जाहीर

गोकुळच्या वतीने दूध उत्पादकांना दिवाळीची भेट जाहीर करण्यात आली. दरवर्षीप्रमाणे यावर्षी म्हैस व गाय दूध दर फरकापोटीची 101 कोटी 34 लाख रुपये इतकी रक्कम प्राथमिक दूध संस्थांच्या खात्यावर सोमवारी (दि. 23) जमा करण्यात येणार असल्याची माहिती गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी गुरुवारी दिली. यामुळे दूध उत्पादकांमधून (milk producers) समाधान व्यक्त होत आहे.

दूध उत्पादकांना गोकुळच्या वतीने अंतिम दूध दरफरक आर्थिक वर्षांच्या शेवटी निश्चित केला जातो. दि. 1 एप्रिल 2022 ते 31 मार्च 2023 या कालावधीत पुरवठा केलेल्या म्हैस दुधास सरासरी प्रती लिटर 2 रुपये 80 पैसे व गाय दूधास 1 रुपये 80 पैसे प्रमाणे दूध संस्थांना अंतिम दूध दर फरक देण्यात येणार आहे. यापैकी प्रती लिटर 0.55 पैसे प्राथमिक दूध संस्थांच्या नावावर डिबेंचर्ससाठी जमा होणार आहेत. दूध उत्पादकांना निव्वळ प्रती लिटर म्हैस दुधास 2 रुपये 25 पैसे व गाय दुधास प्रती लिटर 1 रुपये 25 पैसे इतका अंतिम दूध दरफरक मिळणार आहे.

यावर्षी संघाने म्हैस दुधाकरिता 56 कोटी 38 लाख 19 हजार, तर गाय दुधाकरिता 27 कोटी 99 लाख 82 हजार रुपये इतका दूध दरफरक व त्यावर 6 टक्केप्रमाणे होणारे व्याज 3 कोटी 31 लाख 46 हजार तसेच डिबेंचर व्याज 7 टक्केप्रमाणे 7 कोटी 12 लाख 95 हजार रुपये व शेअर्स भांडवलावरती 11 टक्केप्रमाणे डिव्हिडंड 6 कोटी 50 लाख 92 हजार रुपये असे एकूण 101 कोटी 34 लाख रुपये स्वतंत्र दूध बिलातून जमा करण्यात येणार आहेत. दूध उत्पादकांसाठी गोकुळची ही दिवाळीची गोड भेट आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ व आमदार सतेज पाटील तसेच आघाडीच्या सर्व नेत्यांच्या मार्गदर्शनाखाली गोकुळची वाटचाल यशस्वीपणे सुरू असल्याचेही डोंगळे यांनी सांगितले.

साडेपाच लाख दूध उत्पादकांना लाभ

दर फरकाचा लाभ कोल्हापूर जिल्ह्यातील तसेच सीमा भागातील गोकुळच्या जवळजवळ 5,200 दूध संस्थांच्या 5 लाख 50 हजार दूध उत्पादक (milk producers) सभासदांना होणार आहे. दूध उत्पादकांना देण्यात येणार्‍या एकूण 101 कोटी 34 लाख रुपये अंतिम दूध दर फरकाव्यतिरिक्त गोकुळने या आर्थिक वर्षामध्ये जवळपास 38 कोटी रुपये विविध सेवासुविधा पुरविण्यासाठी दूध उत्पादकांवर खर्च केला असल्याचे डोंगळे यांनी सांगितले.

पशुवैद्यकीय उपचार, कृत्रिम रेतन, वैरण विकास यांसारख्या कार्यक्रमांवर 38 कोटी खर्च
म्हैस दूधवाढ कृती कार्यक्रमअंतर्गत परराज्यातील जातिवंत म्हैस खरेदी अनुदान योजना
गोकुळची सन 2022-23 मधील वार्षिक उलाढाल 3 हजार 429 कोटी रुपये
दूध उत्पादकांना जास्तीत जास्त दर देण्यासाठी संचालक व संघ व्यवस्थापन कटिबद्ध.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *