राजू शेट्टींच्या उमेदवारीला राष्ट्रवादीतून विरोध

(political news) स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी हातकणंगले लोकसभा मतदारसंघातून महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार असू शकतात, अशी चर्चा सुरू असताना राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) बैठकीत शेट्टी यांच्या नावाला कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला आहे. शेट्टी यांना पाठिंबा दिला तर ते आपली संघटना वाढवतील, मग राष्ट्रवादीचे काय? असा सवालच कार्यकर्त्यांनी शरद पवार यांच्यासमोर उपस्थित केला. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचे चिरंजीव प्रतीक पाटील यांचे नाव सूचविण्यात आले आहे. आता जागा वाटप आणि उमेदवारी याचा निर्णय महाविकास आघाडीच्या समन्वय समितीच्या बैठकीत होणार आहे.

राजू शेट्टी यांनी ऊस आणि दूध उत्पादकांच्या प्रश्नावर रान उठवले. 2004 साली विधानसभेत आणि 2009 आणि 2014 मध्ये लोकसभेत त्यांनी विजय मिळवला. विधानसभेची मुदत पूर्ण होण्याआधीच त्यांनी लोकसभेत प्रवेश केला. 2009 ला स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे उमेदवार म्हणून आणि 2014 मध्ये शिवसेना-भाजप युतीच्या पाठिंब्यावर ते विजयी झाले. मात्र, भाजपशी बिनसल्यावर 2019 ची निवडणूक त्यांनी दोन्ही काँग्रेसच्या पाठिंब्यावर लढवली. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला.

आता संभाव्य लोकसभा निवडणुकीत आपण महायुती आणि महाविकास आघाडी या दोघांपासून समान अंतरावर राहणार असल्याचे शेट्टी यांनी पूर्वी म्हटले होते. तरीही महाविकास आघाडीचे संभाव्य उमेदवार म्हणून त्यांच्याकडे पाहिले जात होते. मात्र, बुधवारी मुंबईत झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाच्या बैठकीत राजू शेट्टी यांच्या नावाला राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी विरोध केला. (political news)

यापूर्वीच्या निवडणुकीत त्यांना काँग्रेस, राष्ट्रवादीने पाठिंबा देऊनही पराभव झाला. त्यामुळे आता या नावाचा विचार नको, त्याचबरोबर शेट्टी हे निवडून आल्यास त्यांची संघटना वाढवतील. राष्ट्रवादीला त्याचा उपयोग होणार नाही. त्यामुळे बदलत्या राजकीय परिस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत होण्यासाठी राष्ट्रवादीचा उमेदवार हातकणंगले मतदारसंघात उभा करावा, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. यापूर्वी या मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेसने दोनवेळा विजय मिळवला आहे, अशी पुस्ती कार्यकर्त्यांनी जोडली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *