World Cup सुरु असतानाच भारतीय संघात मोठा बदल!

(sports news) आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कप 2023 ची स्पर्धा सध्या भारतामध्ये खेळवली जात आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 19 नोव्हेंबर रोजी खेळवला जाणार आहे. विश्वचषक स्पर्धेनंतर भारतीय संघ लगेच ऑस्ट्रेलियाविरुद्ध मालिका खेळणार आहे. ऑस्ट्रेलिया आणि भारतामध्ये 5 सामन्यांची टी-20 मालिका खेळवली जाणार आहे. वर्ल्ड कप संपल्यानंतर 4 दिवसांनी म्हणजेच 23 नोव्हेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध टी-20 मालिका सुरु होणार आहे. सध्या भारतीय संघाचं व्यस्त वेळापत्रक पाहता भारताचे प्रमुख प्रशिक्षक राहुल द्रविडसहीत संपूर्ण भारतीय चमूला ब्रेक दिला जाईल. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-20 मालिकेमध्ये सूर्यकुमार यादवकडे भारताचं कर्णधारपद सोपवलं जाणार आहे. तर द्रविडलाही आराम देऊन त्याच्या जागी व्ही. व्ही. एस. लक्ष्मणकडे प्रशिक्षक पदाची जबाबदारी सोपवली जाईल असं सांगितलं जात आहे.

प्रशिक्षकही बदलणार

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे म्हणजेच बीसीसीआयच्या सूत्रांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीनुसार, “जेव्हा जेव्हा राहुल द्रविडने ब्रेक घेतला आहे तेव्हा व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने प्रभारी म्हणून काम पाहिलं आहे. वर्ल्ड कपनंतर लगेच ऑस्ट्रेलियाविरुद्धची मालिका खेळवली जाणार आहे. त्यामुळे या मालिकेतही हेच चित्र पाहायला मिळेल.” राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या प्रमुखपदी असलेल्या व्ही. व्ही. एस. लक्ष्मणने नेहमीच द्रविडच्या अनुपस्थितीत भारताचा प्रशिक्षक म्हणून काम केलं आहे. टी-20 मध्ये हार्दिक पंड्याकडे कर्णधार पद आणि सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधार पद सोपवलं जाण्याची शक्यता आहे. भारतीय संघाला 2024 मध्ये टी-20 वर्ल्ड कप स्पर्धा खेळायची आहे. असं असतानाच सध्या हार्दिक जायबंदी असल्याने सूर्यकुमार यादवकडे कर्णधार पद जाऊ शकतं. त्यामुळे सूर्याच्या नेतृत्व गुणांची चाचपणीही या माध्यमातून करता येईल.

या खेळाडूंना मिळू शकते संधी

रोहित शर्मा, विराट कोहली, हार्दिक पंड्यासारख्या आघाडीचे क्रिकेटपटू ऑस्ट्रेलियाविरुद्धची ही मालिका खेळणार नाहीत. भारताला आशियाई खेळांमध्ये सुवर्ण पदक मिळवून दिणाऱ्या संघातील अनेक खेळाडूंना या मालिकेत संधी दिली जाईल. ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वाखालील संघाने चीनमध्ये आयोजित आशियाई खेळांच्या 19 व्या पर्वात भारताला सुवर्ण पदक मिळवून दिलं. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेमध्ये संजू सॅमसन, यशस्वी जयस्वाल, ऋतुराज गायकवाड, उमरान मलिक आणि रिंकू सिंहलाही संधी मिळू शकते. अजित आगरकरच्या नेतृत्वाखालील निवड समिती सय्यद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये खेळाडू कशी कामगिरी करत आहेत याकडे लक्ष ठेऊन आहेत. (sports news)

असा आहे मालिकेचा शेड्यूल

भारत आणि ऑस्ट्रेलियादरम्यानच्या मालिकेमधील पहिला टी-20 सामना 23 नोव्हेंबर रोजी विशाखापट्टनम येथे होणार आहे. दुसरा सामना 26 नोव्हेंबर रोजी त्रिवेंद्रमला, तिसरा 28 नोव्हेंबर रोजी गुवाहाटीला आणि चौथा सामना 1 डिसेंबर रोजी नागपूरच्या मैदानात खेळवला जाईल. अंतिम सामना 3 डिसेंबर रोजी हैदराबादमध्ये खेळवला जाईल. सर्व सामने भारतीय प्रमाण वेळेनुसार सायंकाळी 7 वाजता सुरु होतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *