‘डीकेटीई’त ५ जी लॅब सेटअप, पंतप्रधान मोदींच्या हस्ते ऑनलाईन अनावरण

येथील डीकेटीईच्या टेक्स्टाईल ऍण्ड इंजिनिअरिंग इन्स्टिटयूटमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ऍण्ड टेलिकम्युनिकेशन विभागास दूरसंचार विभाग, संचार मंत्रालयामार्फत ‘५ जी लॅब’ सेटअपचे अनावरण (Unveiling) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते झाले. इंडिया मोबाईल कॉंग्रेस, नवी दिल्ली येथे झालेल्या ऑनलाईन सोहळ्यात डीकेटीईस ५ जी लॅब प्रदान करण्यात आली. अशी सुविधा मिळविणाऱ्या आयआयटी, एनआयटीसारख्या देशातील नामवंत १०० अग्रगण्य शैक्षणिक संस्थांत डीकेटीईचा समावेश झाला.

याप्रसंगी पंतप्रधान मोदी यांनी ५ जी लॅबबद्दल माहिती सांगितली. हा उपक्रम आधुनिक तंत्रज्ञान, अनन्यसाधारण गरजा, तसेच जागतिक मागणी यांची पूर्तता करणाऱ्या ५ जी ॲप्लीकेशनच्या विकासाला प्रोत्साहन देऊन ५ जी तंत्रज्ञानाशी संबंधित संधीची जाणीव करुन देण्याचा प्रयत्न आहे. यामुळे शिक्षण, कृषी, आरोग्य, ऊर्जा व वाहतूक आदी क्षेत्रांत इनोव्हेशन वाढेल. ६ जी शैक्षणिक आणि स्टार्टअपसाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण पाऊल असेल.

५ जी लॅब उपकरणात ड्रोन्स, मिड बँड स्टॅण्ड ॲलोन सिस्टीम, ५ जी सीम, डोंगल्स, आयओटी गेटवे, राउटर, एआर/व्हीआर कीट आणि ॲप्लीकेशन सर्व्हरचा समावेश असून लॅबच्या गरजा पूर्ण करण्यासाठी व्यवस्थापन डॅशबोर्ड आहे. या लॅबमुळे ५ जी टेक्नॉलॉजीची इत्यंभूत माहिती मिळणार असून त्यावर आधारित विविध संशोधन, प्रयोग व प्रकल्प करता येतील. लॅबमुळे शेतीविषयक, वस्त्रोद्योग, शैक्षणिक, आरोग्य, वाहतूक, एआय, आयओटी क्षेत्रांत शैक्षणिक प्रगती, संशोधनवृत्ती वाढीसाठी आवश्यक ५ जी टेक्नॉलॉजीच्या साधनाचा सुलभ वापर करता येईल. (Unveiling)

यासाठी संस्थाध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, उपाध्यक्ष व आमदार प्रकाश आवाडे, सचिव डॉ. सपना आवाडे, विश्‍वस्त, प्र. संचालिका प्रा. डॉ. एल. एस. आडमुठे व विभागप्रमुख प्रा. डॉ. एस. ए. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. प्रा. डॉ. ए. आर. पाटील यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *