सह्याद्रीत घुमणार वाघांची डरकाळी!
सह्याद्रीच्या डोंगररांगांमध्ये आता विदर्भातून येणार्या नवीन वाघांची (tiger) डरकाळी घुमणार असल्याच्या हालचाली गतिमान झाल्या आहेत. मात्र, त्याआधी वन्यजीव तथा वन विभागाने अभयारण्यामध्ये वाघांसाठी पुरेसे भक्ष्य व आवश्यक त्या उपाययोजना करणे गरजेचे असल्याचे स्थानिक नागरिकांमधून बोलले जात आहे; अन्यथा वन्यप्राणी व मानव यांच्यातल्या आधीच टोकाला गेलेल्या संघर्षाने अथवा या नवीन येणार्या वाघांच्या डरकाळीने या परिसरातला सर्वसामान्य शेतकरीच गारद होईल.
गेल्या कित्येक वर्षांपासून सह्याद्री व्याघ्र प्रकल्पालगत असलेल्या गावांतील लोकांच्या सुरक्षेच्या द़ृष्टीने आतापर्यंत कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत. या व्याघ्र प्रकल्पात वाघ व बिबट्यांचे मुख्य भक्ष्य असलेल्या रानडुक्कर, हरिण, चितळ, भेकर किंवा सांबरांचीही पुरेशी पैदास नाही. जर ती असती, तर बिबट्यांचा मानवी वस्तीत मुक्त संचार बघायला मिळाला नसता. हे वास्तव नाकारून चालणार नाही.
चांदोली परिसरामध्ये गव्यांचा व बिबट्यांचा वावर हा येथील नागरिकांच्या जीवावर बेतल्याच्या याआधी अनेक घटना घडल्या आहेत. अडीच-तीन वर्षांपूर्वी कदमवाडी येथील पांडुरंग कदम नावाच्या शेतकर्याला गव्याच्या हल्ल्यात आपला जीव गमवावा लागला होता. गेल्यावर्षी केदारलिंगवाडी येथे बिबट्याच्या हल्ल्यात मनीषा डोईफोडे ही दहा वर्षांची मुलगी जागीच ठार झाली होती. उखळू येथील अनिकेत आनुते, श्रेयस वडाम ही शाळकरी मुले बिबट्याच्या हल्ल्यात कशीबशी वाचली आहेत. शित्तूर वारुण येथील सर्जेराव पाटील, उदगिरी येथील बंडू फिरंगे व मणदूर येथील अशोक सोनार हे शेतकरी गव्याच्या हल्ल्यात गंभीर जखमी झाले आहेत. रानडुक्कर व गव्यांच्या भीतीने परिसरातील जवळपास अडीचशे हेक्टरपेक्षा अधिकची जमीन ही पडीक आहे.
‘या’ उपाययोजना महत्त्वाच्या
जंगलामध्ये ठिकठिकाणी बारमाही पाणवठे, वन्यप्राण्यांच्या भक्ष्याची पैदास वाढवली पाहिजे.
शासनाने अभयारण्यालगत तातडीने वॉलभिंत (तार फेन्सिंग) कुंपण करून घ्यावे. जेणेकरून वन्यप्राण्यांची जंगलाबाहेरची भटकंती आपोआपच थांबेल.
बफर क्रॉपिंगचे पुढे काय?
यापूर्वी सह्याद्री व्याघ्र (tiger) प्रकल्पातील पिकाऊ जमिनीत पिकांचे उत्पादन घेऊन ते वन्यजीवांसाठी उपलब्ध करून देण्याची एक अनोखी योजना वन विभागाने आखली होती. त्या बफर क्रॉपिंगचे पुढे काय झाले? याचे उत्तर मात्र अद्याप गुलदस्त्यातच आहे.