एक राज्य, एक पेपर! तिसरी ते आठवी परीक्षा; काय होणार फायदे ?

जिल्हा परिषद, पालिकेच्या शाळांत प्रथम सत्र व द्वितीय सत्र परीक्षांसाठी (exam) आपापल्या स्तरावर पेपर काढले जातात. खासगी अनुदानित शाळांना मुख्याध्यापक संघाकडून पेपर पुरविले जातात. पण, आता राज्यभरात शाळांत एकच पेपर पुरविला जाणार आहे. त्यानुसार तिसरी ते आठवीसाठी प्रथम भाषा, गणित व इंग्रजी विषयांची परीक्षा होणार आहे. त्यामुळे मूल्यमापनात समानता येईल.

शालेय परीक्षांतून विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होते. त्यासाठी पहिल्या सत्राअखेरीस प्रथम सत्र परीक्षा होते. दुसऱ्या सत्राच्या अखेरीस व्दितीय सत्र परीक्षा होते. या परीक्षांसाठी जिल्हा परिषद व पालिकेच्या शाळेतील शिक्षक पेपर काढतात. फार तर शेजारच्या शाळेतील शिक्षकांकडून पेपर घेतले जातात.

त्यामुळे विद्यार्थ्यांचे मूल्यमापनही शाळांच्या स्तरावर वेगवेगळे होते. खासगी अनुदानित शाळांना जिल्हा मुख्याध्यापक संघाकडून पेपर पुरविले जातात. त्यामुळे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचे मूल्यमापन होते. विद्यार्थ्यांच्या मूल्यमापनात समानता येण्यासाठी शासनाने यंदापासून नियतकालिक मूल्यमापन चाचणी (पीएटी) सुरू केली आहे.

तिसरी ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी ही चाचणी (exam) असेल. याअंतर्गत प्रथम भाषा, गणित व इंग्रजी विषयांचे पेपर शासनाकडून पुरविले जातील. राज्यभरातील विद्यार्थ्यांसाठी एकच पेपर असेल. वर्षातून दोनवेळा चाचणी होईल. ही चाचणी प्रथम सत्र व व्दितीय सत्र परीक्षेवेळीच होणार असल्याने या विषयांची स्वतंत्र परीक्षा घ्यावी लागणार नाही. हे विषय वगळून अन्य विषयांचे पेपर नियमित पद्धतीने होतील.

परीक्षा शुल्क होईल कमी…

प्रथम सत्र व व्दितीय सत्र परीक्षेसाठी शाळा विद्यार्थ्यांकडून शुल्क घेतात. शाळास्तरावरच पेपर निघत असल्याने छपाई खर्च करावा लागतो. आता शासनाकडूनच तीन विषयांचे पेपर पुरविले जाणार असल्याने त्यांच्या छपाईचा खर्च कमी होईल. त्यामुळे परीक्षाशुल्कही कमी होईल.

इंग्रजी माध्यमाला दोनच पेपर…

नियतकालिक मूल्यमापन चाचणीत प्रथम भाषा, गणित व इंग्रजी विषयांची परीक्षा होईल. मराठी माध्यमासाठी प्रथम भाषा मराठी तर ऊर्दू माध्यमासाठी प्रथम भाषा उर्दू आहे. त्यामुळे दोन्ही माध्यमांसाठी तीन पेपर होतील. ३०, ३१ ऑक्टोबर व १ नोव्हेंबरला हे पेपर होतील. पण, इंग्रजी माध्यमासाठी इंग्रजीच प्रथम भाषा असल्याने या माध्यमासाठी इंग्रजी व गणित असे दोनच पेपर असतील.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *