तूर्त दिलासा! कृष्णा नदीपात्रात कोयना धरणातून पाणी; उद्या सांगलीत बैठक

कृष्णा नदीपात्र कोरडे पडल्याने सर्व स्तरातून जोरदार आवाज उठविला गेल्यामुळे कोयना धरणातून अखेर शुक्रवारी दुपारी पाणी (water) सोडले गेले. पायथा वीजगृहातून दोन जनित्रांद्वारे वीजनिर्मिती करून पूर्वेकडे सिंचनासाठी 2 हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पाणी सोडल्याने शेतकरी, नागरिकांना काही प्रमाणात दिलासा मिळाला.

कृष्णा नदीतून पाणी उपसा मोठ्या प्रमाणात झाल्याने आठ दिवसांपासून सांगली जिल्ह्यातील कृष्णा नदीचे पात्र बहुतेक ठिकाणी कोरडे पडले आहे. त्यामुळे नदीकाठासह अनेक गावांतील पिण्याच्या पाण्याचा व सिंचनाचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे पाणी सोडण्याची मागणी सतत होत होती. मात्र सातार्‍याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी, सांगली जिल्ह्याची कालवा समितीची बैठक घेऊन पाण्याचे नियोजन केल्याशिवाय पाणी सोडण्यात येऊ नये, अशी भूमिका घेतल्याचे अधिकारी वर्ग सांगत होता. दुसर्‍या बाजूला सांगलीच्या पालकमंत्र्यांना कालवा समितीची बैठक घेण्यासाठी रविवारपर्यंत वेळ नव्हता. त्यामुळे पाणीप्रश्न अधिकच गंभीर बनला.

पालकमंत्री, खासदार, आमदार यांनी पाणी (water) सोडण्याबाबत उपमुख्यमंत्री तथा जलसंपदामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा केला. शुक्रवारी राष्ट्रवादी, काँग्रेस, इरिगेशन फेडरेशन यांच्यातर्फे आंदोलन केले. त्यामध्ये सरकारवर सडकून टीका करण्यात आली. नागरिकांमधून वाढता असंतोष लक्षात घेऊन अखेर पाणी सोडले. दुपारी एक वाजता प्रतिसेकंद 1050, तर चार वाजल्यापासून प्रतिसेकंद दोन हजार 100 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे. सध्या धरणात 89.07 टीएमसी पाणीसाठा आहे. त्यापैकी 83.95 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. एक जूनपासून सुरू झालेल्या पावसात कोयना येथे 4 हजार 60, तर नवजा येथे 5 हजार 642 व महाबळेश्वरला 5 हजार 451 मिलिमीटर पावसाची नोंद झाली.

सहा दिवस पाणी सोडणार

सध्या एक टीमएसी पाणी सोडण्याचा निर्णय झाला आहे. प्रतिसेकंद 2 हजार 100 क्युसेकप्रमाणे सहा दिवस पाणी सोडले जाणार आहे. कालवा समितीची रविवारी ( दि. 29) बैठक होणार असून सातारा, सांगली व कोल्हापूर या जिल्ह्यांचे पालकमंत्री, आमदार उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पाणी सोडण्याचे नियोजन होणार आहे.

सांगलीत पाणी येण्यास चार दिवस लागणार

कोयनेतून सोडलेले पाणी येथील नदीपात्रात पोहोचण्यासाठी चार दिवस लागणार आहेत. नदीवरील बंधारे भरत पाणी येणार आहे. सोमवारी रात्री किंवा मंगळवारी सकाळी पाणी येईल, असा अंदाज अधिकार्‍यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *