वाटंगी गावात बनले तणावाचे वातावरण

वाटंगी (ता. आजरा) येथे जलजीवन मिशन योजनेच्या उद्घाटनासाठी खासदार संजय मंडलिक व आमदार राजेश पाटील आले होते. मात्र मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मराठा समाज बांधवांनी त्यांना उद्घाटनाचा कार्यक्रम करण्यास विरोध केला. खासदार मंडलिक यांच्या गाडीखाली जाण्याचा प्रयत्नही काही कार्यकर्त्यांनी केला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. खासदार मंडलिक व आमदार पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी (reservation) प्रयत्नशील असल्याचे यावेळी सांगितले.

वाटंगी येथे ग्रामपंचायतींच्या कार्यक्रमाचे उद्घाटन खासदार मंडलिक व आमदार पाटील यांच्या हस्ते रविवारी होणार होते. तत्पूर्वी शनिवारी सायंकाळी मराठा समाज बांधवांनी आरक्षण जोपर्यंत मिळत नाही, तोपर्यंत गावात राजकीय नेत्यांना बंदी करण्यात येणार असल्याचे जाहीर केले. कार्यक्रमालाही विरोध करण्याचे ठरविण्यात आले. रविवारी सकाळी मराठा बांधव बसस्थानक परिसरात मोठ्या संख्येने जमा झाले. काळे झेंडे व काळ्या फिती लावून मराठा आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नेत्यांना गावात प्रवेश नाही, अशी भूमिका त्यांनी घेतली. एक मराठा, लाख मराठाच्या घोषणांनी परिसर दणाणून गेला होता. यामुळे गावातील वातावरण तणावाचे बनले होते.

यादरम्यान खासदार मंडलिक व आमदार पाटील यांचे गावामध्ये आगमन झाले. काही कार्यकर्त्यांनी त्यांच्या गाडीखाली जाण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी हस्तक्षेप करीत कार्यकर्त्यांना रोखले. यावेळी काळे झेंडे दाखवून निदर्शने करण्यात आली. ग्रामस्थांच्या वतीने विजय देसाई, संदीप देसाई, चंद्रकांत देसाई, सदानंद देसाई यांनी मराठा समाजाच्या भावना व्यक्त केल्या. पाणी योजनेचे उद्घाटन करण्यास विरोध केला. मंडलिक व पाटील यांना निवेदन देण्यात आले. यावेळी मराठा समाजाच्या भावना लक्षात घेऊन पाणी योजनेचे उद्घाटन करणार नसल्याचे दोघांनी सांगितले. मराठा समाजाला आरक्षण (reservation)मिळण्यासाठी शासनस्तरावर पाठपुरावा करण्यात येईल, असे सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *