शेतकर्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले ‘या’ बैठकीतील निर्णयाकडे
जिल्ह्यातील साखर कारखानदार आणि शेतकरी संघटना यांची गुरुवारी (दि. 2) जिल्हाधिकारी कार्यालयात बैठक (meeting) आयोजित केली आहे. दुपारी साडेबारा वाजता ही बैठक होणार आहे.
गतवर्षी गाळप झालेल्या उसाला 400 रुपयांचा दुसरा हप्ता द्यावा, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांनी आक्रोश पदयात्रा काढली आहे. मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ही यात्रा स्थगित करण्यात आली असली, तरी याबाबत निर्णय झाल्याखेरीज ऊस तोडू देणार नाही, असा पवित्रा शेतकरी संघटनेने घेतला आहे.
त्यातून ऊस वाहतूक, ऊसतोडी रोखल्या जात आहेत. त्यातून कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता आहे. दरम्यान, जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची ऊस परिषदही होत आहे. या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनाने जिल्ह्यातील सर्व साखर कारखानदार आणि सर्व शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींची बैठक (meeting) बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होणार, याकडे शेतकर्यांसह संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.