शेकाप, जनता दल सत्ताधारी आघाडीसोबत

करवीर तालुक्यातील एकमेकांचे कट्टर राजकीय प्रतिस्पर्धी आ. पी. एन. पाटील व शेकापचे ज्येष्ठ नेते माजी आ. संपतराव पवार-पाटील भोगावती साखर कारखाना निवडणुकीच्या (election) निमित्ताने 34 वर्षांनंतर एकत्र आले आहेत. त्यामुळे भोगावतीच्या निवडणुकीत काँग्रेस, राष्ट्रवादी, शेकाप व जनता दल अशी सत्तारुढ आघाडी होणार आहे. आणखी काही संघटना सोबत येणार असल्याचा दावा करण्यात आला आहे.

कारखाना शेतकर्‍याच्या मालकीचा राहावा, कारखान्याला गतवैभव प्राप्त व्हावे, या उद्देशाने एकत्र येत असल्याचे सोमवारी आ. पी. एन. पाटील, राष्ट्रवादी (अजित पवार) जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील, शेकपचे क्रांतिसिंह पवार-पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

भोगावती निवडणुकीत सत्तारुढ आघाडीच्या विरोधात मोट बांधण्यासाठी शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते माजी आ. संपतराव पवार-पाटील यांनी पुढाकार घेतला होता. विरोधकांची बैठकही झाली होती. त्यामुळे शेकापने आपल्यासोबत यावे यासाठी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांचे प्रयत्न सुरू होते. यामध्ये त्यांना यश आले.

आ. पी. एन. पाटील म्हणाले, सध्या साखर कारखाने अडचणीत आहेत. त्यामुळे भोगावती साखर कारखान्याची निवडणूक बिनविरोध व्हावी, अशी आपली सुरुवातीपासून भूमिका आहे. यासंदर्भात भोगावती खोर्‍यातील सर्वांना आवाहनही केले होते. त्याला शेकाप व जनता दलाने प्रतिसाद देत आघाडीसोबत येण्याचा निर्णय घेतला. अन्य संघटनांशीही चर्चा सुरू आहे. दोन दिवसांत त्याबाबत निर्णय होईल. कारखान्याच्या हितासाठी गेल्या 34 वर्षांपासूनचे मतभेद बाजूला ठेवून आम्ही एकत्र येत आहोत.

भोगावती कारखान्याला पुनर्वैभव प्राप्त करून देण्याकरिता निवडणूक (election) बिनविरोध करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न सुरू होते. आमच्या आवाहनास प्रतिसाद देत शेकाप व जनता दलाने मतभेद बाजूला ठेवून संघर्ष टाळण्यासाठी सत्तारुढ आघाडीसोबत राहण्याचा चांगला निर्णय घेतला, असे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील यांनी सांगितले.

कारखाना स्थापन करण्यासाठी ज्यांनी प्रयत्न केले ती घराणी मधल्या काळात बाजूला गेली होती. त्या घराण्यातील पुढची पिढी या निवडणुकीच्या निमित्ताने एकत्र येत आहे. कारखाना शेतकर्‍यांच्या मालकीचा रहावा यासाठी सत्तारुढ आघाडीसोबत काम करण्याचे ठरविले असल्याचे शेकापचे क्रांतिसिंह पाटील यांनी सांगितले.

यावेळी बाजार समितीचे सभापती भारत पाटील, केरबा पाटील, उदयसिंह पाटील – कौलवकर, वसंतराव पाटील, गोकुळ संचालक प्रा. किसन चौगुले, पी. डी. धुंदरे, बी. के. डोंगळे आदी उपस्थित होते.

पॅनेलची घोषणा

सत्तारुढ आघाडीच्या पॅनेलची रचना झाली आहे. किरकोळ जागांबाबत चर्चा सुरू आहे. त्यामुळे दोन दिवसांत पॅनेलची घोषणा होण्याची शक्यता आहे.

कारखान्याची कसलीही चौकशी करावी

गेल्या वर्षीच्या उसाला 400 रुपये जादा मिळावे, ही शेतकरी संघटनेची मागणी राज्य पातळीवरील आहे. त्याबाबत जो निर्णय होईल त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. कारखान्याच्या सी.ए.मार्फत किंवा अन्य कोणत्याही यंत्रणेमार्फत चौकशी करावी, आम्ही त्याला तयार आहोत, असेही आ. पाटील यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. शेतकरी संघटनेला एक कारखाना चालविण्यास द्यावा, असा टोलाही त्यांनी लगावला.

आपण कायम राहण्यास तयार आहोत

‘भोगावती’पुरते आपण एकत्र आला आहात काय असे विचारले असता पी. एन. पाटील क्रांतिसिंह पाटील यांच्याकडे पहात म्हणाले, कायम एकत्र राहण्याची आपली तयारी आहे. त्यांची आहे की नाही हे तुम्ही त्यानांच विचारा.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *