अजित पवारांच्या भेटीनंतर शरद पवारांचं सूचक विधान

(political news) ऐन दिवाळीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि त्यांच्याविरोधात भूमिका घेत शिंदे सरकारमध्ये सहभागी झालेले त्यांचे पुतणे तसेच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या भेटीमुळे महाराष्ट्रात राजकीय फटाके फुटण्याची चिन्हं आहेत. शुक्रवारी म्हणजेच धनत्रयोदशीला गल्लीपासून दिल्लीपर्यंत सुरू असलेल्या राजकीय घडामोडींमुळे या चर्चांना उधाण आलं आहे. दुपारी अजित पवारांनी पुण्यात काका शरद पवारांची भेट घेतली. काका-पुतण्याच्या या भेटीमुळं सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला. पवारांच्या भेटीनंतर अजितदादांनी संध्याकाळी थेट राजधानी दिल्ली गाठली. विमानतळावरून ते थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांच्या घरी गेले. तिथं प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे यांच्यासोबत त्यांनी अमित शाहांची भेट घेतली. दोघांमध्ये यावेळी सुमारे दीड तास चर्चा झाल्याचं समजतंय. या भेटीत नेमकं काय घडलं, त्यावरुन चर्चांना उधाण आलेलं असतानाच शरद पवारांनी आज म्हणजेच शनिवारी दिवाळीच्या शुभेच्छा देताना एक सूचक विधान केलं आहे.

शरद पवारांचं सूचक विधान

शरद पवारांचे बंधू प्रतापराव पवार यांच्या बाणेरमधील घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली. यावेळी अजित पवारांसह सर्व पवार कुटुंब उपस्थित होतं. दिवाळीनिमित्त ही भेट असल्याचं सांगण्यात आलं. यानंतर दुसऱ्याच दिवशी शरद पवार यांनी दरवर्षीप्रमाणे यंदाही जनतेला शुभेच्छा देणारा व्हिडीओ जारी केला आहे. या व्हिडीओमध्ये त्यांनी अजित पवार आणि इतर कुटुंबियांची भेट घेतल्याचा संदर्भ दिला आहे. “सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चढ उतार असतात. अडचणी असतात. वेळेप्रसंगी काही संकटांना सुद्धा तोंड द्यावं लागतं. पण आयुष्यात प्रतीवर्षी काही दिवस असे असतात, की या संकटाचं विस्मरण करुन कुटुंबासोबत काही दिवस घालवावेत, जगावं अशाप्रकारची इच्छा असते. अशी इच्छा प्रदर्शित करण्याचा दिवस हा आजचा दिवाळीचा दिवस आहे,” असं शरद पवार म्हणाले. या विधानामधून त्यांनी राजकीय मतभेद विसरुन आपल्या कुटुंबियाची भेट घेतल्याचं अधोरेखित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

पवारांनी दिल्या शुभेच्छा

“उभ्या महाराष्ट्रामध्ये आणि देशामध्ये पुढील 2-3 दिवसांमध्ये लोक उत्साहाने सण साजरा करतात. मी महाराष्ट्रातील जनतेला दिवाळीचा सण आनंदाने जावो, त्यांच्या व्यक्तीगत आणि कौटुंबिक जीवनामध्ये समृद्धी येवो. पुढच्या आयुष्याचा जो काही कार्यक्रम त्यांनी आखला आहे त्यामध्ये यावर्षी भरभरुन यश येवो, अशाच शुभेच्छा मी या प्रसंगी व्यक्त करतो,” असं शरद पवार म्हणाले. (political news)

पवारांच्या भेटीनंतर अजित पवार दिल्लीला

मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादीत राजकीय उलथापालथींना वेग आलाय. अजित पवारांच्या भेटीआधी शुक्रवारी सकाळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटलांनी शरद पवारांची भेट घेतली. दिलीप वळसे पाटील हे एकेकाळचे पवारांचे कट्टर निकटवर्तीय समजले जातात. शरद पवारांना पुन्हा एनडीएत सामील करण्याच्या हालचाली सुरू झाल्यात का, अशी कुजबूज कानावर पडतेय. पवारांच्या भेटीनंतर अजित पवारांनी तातडीनं अमित शाहांची भेट घेतल्यानं मुख्यमंत्री बदलाची चर्चाही पुन्हा राजकीय वर्तुळात सुरू झालीय. मुख्यमंत्रीपद मिळत नसल्यानं अजित पवार नाराज असल्याचं बोललं जातं.

राजकीय वर्तुळात चर्चा

महाराष्ट्रात मराठा आरक्षणाचा मुद्दा पेटला असताना नेमका अजितदादांना डेंग्यू झाला. मराठा आरक्षणात त्यांनी काहीच भूमिका घेतली नाही, याबद्दल भाजपच्या गोटात नाराजी असल्याचं समजतंय. अजितदादांचा आजार हा राजकीय आजार असल्याची टीका विरोधकांनीही केली. डेंग्यूच्या आजारातून बरे होत असलेले अजित पवार पुन्हा कामाला लागल्याचं चित्र शुक्रवारी दिसलं. शरद पवारांची भेट घेऊन त्यांनी थेट दिल्ली गाठली. आता तरी त्यांची नाराजी दूर होणार का, या प्रश्नाचं उत्तर अमित शाहांच्या भेटीतून मिळणार आहे. पुण्यात शरद पवार आणि अजित पवारांची भेट झाल्यानं सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत. सध्याच्या राजकीय पेचातून मार्ग काढण्यासाठी काका-पुतणे पुन्हा एक होणार का, याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *