…ते ED च्या भीतीने पळत सुटलेत; राजू शेट्टींचा कोणावर निशाणा?

आम्ही आमच्या हक्काचे दाम मागत आहोत. ते मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ तर बसणार नाहीच, शिवाय साखर कारखानदारांना (Sugar Factory) देखील स्वस्थ बसू देणार नाही, असा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी दिला.

गुरुवारी (ता. १६) दुपारी कोल्हापुरात पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत ऊस दराचा हिशोब मांडणार आहे. त्यावर तोडगा न निघाल्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौऱ्यावेळी त्यांना कोल्हापूर विमानतळावरच घेराओ घालण्याबरोबरच येत्या रविवारी (ता. १९) सर्वत्र चक्का जाम आंदोलन (agitation) छेडण्याचा इशाराही स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष माजी खासदार राजू शेट्टी यांनी दिला.

गतवर्षीचा चारशे रुपयांचा उर्वरित हप्ता द्यावा, तसेच यंदाच्या गळीत हंगामातील उसास प्रती टन ३५०० रुपये दर देण्यात यावा या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाअंतर्गत स्वाभिमानी शेतकरी संघटना हातकणंगले तालुका व शहर शाखेतर्फे बुधवारी (ता.१५) रात्री येथील हुतात्मा स्मारक मैदानावर आयोजित जाहीर सभेत ते बोलत होते. अध्यक्षस्थानी तालुका अध्यक्ष राजाराम देसाई होते.

सभेत राजू शेट्टी यांनी आपण आंदोलन (agitation) लादले आहे का? इच्छा विरुद्ध आंदोलन करत आहे का? असा प्रश्न विचारताच उपस्थित शेतकऱ्यांनी नाही नाही म्हणत पाठिंबा कायम केला. मागील उसाचे चारशे रुपये घेण्यासाठी आणखी पंधरा दिवस वाट बघायला तयार आहात का? असे विचारताच शेतकऱ्यांनी हात उंचावत आठ दिवसच काय महिनाभर वाट बघायला लागले तरी चालेल, पण ऊस दर आंदोलन चालूच ठेवण्याचा ठाम निर्धार यावेळी केला.

शेट्टी म्हणाले, ऊस दराचे आंदोलन हे चार पाच कारखान्याविरोधात आहे हा कारखानदारांचा कांगावा आहे. आपले आंदोलन कोल्हापूर, सांगली जिल्ह्यातील सर्वच सहकारी तसेच खाजगी साखर कारखान्यांविरोधात आहे. दोन्ही जिल्ह्यातील बहुतांश कारखाने बंद आहेत. शांततेच्या मार्गाने गेले दीड महिना झाले ऊस आंदोलन सुरू आहे. पण, या विषयी सत्ताधारीच काय विरोधी पक्षातील नेतेसुध्दा एक शब्दही बोलायला तयार नाहीत.

त्यामागे त्या सर्वांचे साखर कारखाने आहेत हे कारण आहे असे सांगून कारखान्यात केलेली गैरकृत्ये बाहेर पडू नयेत म्हणून ते इडीच्या कारवाईच्या भीतीने इकडे-तिकडे उंदरासारखी पळत सुटले असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेचा अपवाद आहे. कारण, त्यांच्याकडे साखर कारखाने नाहीत असेही ते म्हणाले.

ज्या ताकदीने कारखानदार ऊस आंदोलन मोडीत काढण्याचा प्रयत्न करतील तितक्याच ताकदीने आंदोलन पुढे रेटले जाईल. शेतकऱ्यांच्या अंगावर बाउन्सर घालण्याचा प्रयत्न केल्यास उसाच्या फटक्याने त्यांना फोडून काढण्यास मागे पुढे बघणार नाही, असा इशारा शेट्टी यांनी दिला. जिल्हाच काय प्रसंगी राज्यात किंवा देशात जिथे जिथे शेतकरी वर्गावर अन्याय होईल तिथे आपण शेतकऱ्यांसाठी लढत राहू.

आपला ‘दत्ता सामंत’ करु अशा धमक्या दिल्या जात आहेत. पण, अशा पोकळ धमक्यांना मी भिक घालणारा नाही. कामगार नेते दत्ता सामंत, के. एल. मलाबादे या सच्च्या नेत्यांच्या विचाराचा वारसदार आहे, याचा मला अभिमान आहे असे सांगून प्रसंगी शहीद होण्याची वेळ आलीच तर त्यास हसत सामोरे जाण्यास तयार असल्याचे ते म्हणाले.

पोलीस प्रशासन कारखाना धार्जिणे वागत असल्याचा त्यांनी यावेळी केला. ते म्हणाले, दबावापोटी पोलिसांनी कार्यकर्त्यांवर खोट्या केसेस दाखल करू नयेत. खोट्या केसेसना संघटना भीक घालणार नाही असे ठामपणे नमूद करून त्यांनी पोलिसांच्या कार्यपद्धतीचा खरपूस शब्दात समाचार घेतला.

दीपावली सणाच्या निमित्ताने एकीकडे फटाक्यांची आतषबाजी सुरू असताना माजी खासदार राजू शेट्टी यांनी येथे बुधवारी रात्री साखर कारखानदार यांच्या विरोधात आरोप-प्रत्यारोपांची जोरदार आतषबाजी केली. सभेस शेतकऱ्यांसह जनसमुदाय मोठ्या संख्येने उपस्थित होता.

भाऊबीज सणानिमित्त शेतकरी संघटनेतर्फे घेण्यात आलेल्या महिला कार्यकर्त्यांच्या खर्डा भाकरी आंदोलनाची खिल्ली उडविणाऱ्या साखर कारखानदार व त्यांच्या कुटुंबीयांचा राजू शेट्टी यांनी सभेत आक्रमक पण संयमाने जोरदार समाचार घेत कारखानदारांनी फ्रेंच राज्यक्रांतीची आठवण ठेवण्याचे आवाहन केले. शेट्टी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना हात उंचावत आंदोलन प्रसंगी ठाम राहण्याची शपथ दिली.

दरम्यान, सभास्थळी तसेच परिसरात मोठ्या संख्येने पोलिस बंदोबस्त तैनात होता. जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी येथे भेट देऊन पाहणी तसेच मार्गदर्शन केले. आंदोलन शांततेत पार पाडण्याचे आवाहन त्यांनी केले. इचलकरंजी विभागाचे उपअधीक्षक साळवे तळ ठोकून होते.

सभेत सावकार मादनाईक, विठ्ठल मोरे, राजाराम देसाई आदींची भाषणे झाली. यावेळी सागर शंभूशेटे, राजु खिचडे, राम शिंदे, राजु शिंदे, एम. आर. पाटील, सुशील पाटील, विद्याधर पाटील (रांगोळी), शैलेश अडके, शिरोळ पंचायत समितीच्या माजी सभापती सुवर्णा अपराज , अशोक बल्लोळे, रघुनाथ पाटील (रेंदाळ) आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *