करवीर तालुक्यात ‘इतक्या’ हजार कुणबी नोंदी
मनोज जरांगे-पाटील यांनी 24 डिसेंबर पर्यंतचा अल्टिमेटम दिल्यानंतर सरकारने प्रत्येक जिल्ह्यात अभिलेख शीघ्र गतीने तपासण्याचे (checking) आदेश दिले आहेत. जिल्हाधिकार्यांच्या सूचनेनुसार करवीर तहसील कार्यालयात जुन्या मराठी भाषेतील जन्म-मृत्यू नोंदीचे अभिलेख तपासून कुणबी नोंदी शोधण्याचे काम पूर्ण झाले आहे. 2 लाख 66 हजार 299 जुन्या नोंदींची तपासणी पूर्ण झाली असून त्यात 11 हजार 742 कुणबी नोंदी मिळाल्या आहेत. उपअधीक्षक भूमिअभिलेख करवीर व नगर भूमापन कार्यालय कोल्हापूर याठिकाणी एकही नोंद सापडली नाही.
करवीर तहसील कार्यालयाच्या अभिलेख विभागातील जन्म-मृत्यू मराठी नोंदींची तपासणी कार्यालयीन कर्मचार्यांमार्फत गेल्या दहा दिवसांपासून सुरू होती. ती नुकतीच पूर्ण झाली असून यामध्ये 11 हजार 742 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. मोडी अभिलेख तपासण्याचे काम मंगळवारपासून सुरू करण्यात येणार असल्याचे कार्यालयीन अधिकार्याकडून स्पष्ट करण्यात आले.
उपअधीक्षक भूमिअभिलेख, करवीर कार्यालयातील प्रतिबुक, क्षेत्रबुक, पक्काबुक, गुणाकार बुकमधील मराठी नोंदींची तपासणी सुरू आहे. आतापर्यंत 18 हजार 836 पानांतील 22 हजार 143 नोंदी तपासण्यात आल्या आहेत. यामध्ये एकही कुणबी नोंद सापडलेली नाही. पुढील एक आठवड्यात या कार्यालयातील मराठी नोंदी तपासण्याचे (checking) काम पूर्ण होईल. यानंतर मोडी तज्ज्ञांकडून मोडी लिपीतील अभिलेख तपासण्यात येणार आहेत, अशी माहिती करवीर भूमिअभिलेखचे उपअधीक्षक किरण माने यांनी दिली.
नगर भूमापन अधिकारी कार्यालय कोल्हापूर या कार्यालयात आतापर्यंत मिळकत पत्रकाच्या 25 हजार मराठी नोंदी तपासण्यात आल्या आहेत. यामध्ये एकही कुणबी नोंद सापडली नसल्याचे नगर भूमापन अधिकारी शशिकांत पाटील यांनी सांगितले आहे.