ऊसदराचा दोन दिवसांत निर्णय द्या, अन्यथा….
गेल्या वर्षी गाळप झालेल्या उसाचा दुसरा (Sugarcane Rate) हप्ता ४०० रुपये आणि यावर्षीच्या उसाला तीन हजार ५०० पहिली उचल द्यावी, या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने काल (रविवार) जिल्हाभर चक्काजाम आंदोलन (Shetkari Andolan) केले. कोल्हापूर, सांगली महामार्गासह ग्रामीण भागातही या आंदोलनाला मोठा प्रतिसाद मिळाला.
यावेळी पोलिस आणि कार्यकर्त्यांमध्ये काही ठिकाणी शाब्दिक बाचाबाची झाली. दरम्यान, दोन दिवसांत निर्णय न झाल्यास रविवारी (ता. २६) राष्ट्रीय महामार्ग रोखण्याचा इशारा माजी खासदार राजू शेट्टी (Raju Shetti) यांनी हातकणंगले येथे दिला.
उसाला अपेक्षित दर (Sugarcane Rate) मिळावा, यासाठी श्री. शेट्टी यांनी तेरा सप्टेंबरपासून आंदोलन सुरू आहे. २१ दिवस आक्रोश पदयात्रा काढून उसाला दर द्यावा, या मागणीचे निवेदन साखर कारखान्यांना दिले. त्याशिवाय तोडगा निघण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात तीन वेळा बैठका घेण्यात आल्या. मात्र, हा प्रश्न अद्याप निकाली निघालेला नाही. त्यामुळे श्री. शेट्टी यांनी सांगली व कोल्हापूर जिल्ह्यासह राज्यातील ऊस असणाऱ्या भागांमध्ये चक्काजाम आंदोलन करण्याचे आवाहन केले होते. त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.
काही मार्गांवरील बससेवा सकाळी दहा ते दुपारी बारापर्यंत स्थगित ठेवण्यात आली. दुपारनंतर सर्व वाहतूक सुरळीत सुरू झाली. मंगळवारी (ता. २१) स्वाभिमानी शेतकरी संघटना, कारखानदार आणि प्रशासनाची समन्वय बैठक होणार आहे. त्याकडे आता सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.
येथे झाली आंदोलने…
जिल्ह्यातील अनेक ठिकाणी तब्बल दोन तासांहून अधिक काळ चक्काजाम केल्याने रस्त्याच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या. जिल्ह्यात अंकली टोल नाका, चौंडेश्वरी फाटा, नृसिंहवाडी, कबनूर, नदीवेस-इचलकरंजी, हेरवाड, हुपरी, वडगाव, कागल, गडहिंग्लज, चंदगड, शाहूवाडी, कोडोली, परिते, तावडे हॉटेल, शिये, हातकणंगले, भोगावती, कोपार्डे, उत्तूर, शाहूवाडी, बांबवडे, अडकूर, पाटणे फाटा, कोवाड, आदी ठिकाणी आंदोलन झाले. यावेळी श्री. शेट्टी यांच्यासह ‘स्वाभिमानी’च्या स्थानिक कार्यकर्त्यांनी कारखानदारांवर जोरदार टीका केली.