किती बळीनंतर वन विभागाला येणार जाग?
शाहूवाडी तालुक्याच्या उत्तर भागातील शित्तूर वारुणपैकी तळीचा वाडा येथे सोमवारी बिबट्याच्या हल्ल्यात (leopard attack) सारिका बबन गावडे या नऊ वर्षांच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला. याआधी मनीषा डोईफोडे या अकरा वर्षांच्या मुलीवर बिबट्याने हल्ला करून तिलाही जागीच ठार केले होते. दोन वर्षांपूर्वी पांडुरंग कदम नावाच्या शेतकर्याचा गव्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला होता. आणखी किती बळी गेल्यानंतर वन विभागाला जाग येणार, असा खडा सवाल आता ग्रामस्थांमधून उपस्थित केला जात आहे.
या परिसराला लागूनच चांदोली अभयारण्य आहे. या अभयारण्यातील बिबटे व गवे हे अन्न व पाण्याच्या शोधात मानवी वस्तीत येऊन पोहोचले आहेत. त्यांचा मानवी वस्तीतला वावर हा आता नागरिकांसह विशेषतः लहान मुलांच्या जीवावर बेतू लागला आहे.
आतापर्यंत या परिसरातल्या अगणित पाळीव प्राण्यांचा बिबट्याने (leopard attack) फडशा पाडला आहे. आता मात्र लहान मुलांना बिबटे आपले भक्ष्य बनवत आहेत. वन्यप्राणी आणि मानव यांच्यातल्या टोकाला गेलेल्या संघर्षाची ही परिणती आहे.
चांदोली अभयारण्यालगत कोणत्याही प्रकारची चर अथवा तारेचे कुंपण नसल्यामुळेच वन्य प्राण्यांना थेट मानवी वस्तीत प्रवेश करता येतो. दुर्दैवाने अशा मोकाट सुटलेल्या बिबट्यांचा वन विभागाकडून कोणत्याही प्रकारचा बंदोबस्त केला जात नाही. हेच खरे तर, इथल्या नागरिकांचे दुर्दैव आहे.
वन्यप्राण्यांचा मानवी वस्तीतला वावर व मानवावर त्यांच्याकडून सततचे होणारे हल्ले रोखण्यासाठी शाहूवाडी वन विभाग व त्याचा कार्यभार सांभाळणारे वनपरिक्षेत्र अधिकारी हे सपशेल अपयशी ठरले आहेत. त्यांची तातडीने बदली करण्यात यावी, अशा भावना नागरिकांतून व्यक्त केल्या जात आहेत.
आमची सुरक्षा आम्हाला करू द्या, असाही सूर!
तुम्हाला आमची सुरक्षा करता येत नसेल, तर आम्हाला आमची सुरक्षा करण्यासाठी बंदुका वापरण्याची परवानगी द्या. नाही तर तुमच्या बिबट्यांचा तुम्ही बंदोबस्त करा, असा वन विभागाच्या विरोधातला सूर देखील नागरिकांमधून आळवला जात आहे.
जीव गेल्यानंतर मिळणारी मदत काय कामाची?
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांत मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना पंधरा ते वीस लाख रुपयांपर्यंत मदत केली जाते; मात्र गेलेल्या त्या निष्पाप जीवाचे काय? जीव गेल्यानंतर मिळणारी मदत ती काय कामाची, असा मनाला चटका लावणारा प्रश्न नागरिकांतून विचारला जात आहे.