संकेतस्थळावर लोकांसाठी उपलब्ध होणार कुणबी नोंदी
जिल्ह्यात शोध मोहिमेदरम्यान आढळून आलेल्या कुणबी नोंदी (records) सर्वसामान्य नागरिकांसाठी उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर नागरिकांना या नोंदी पाहता येणार आहेत. त्याचे काम सुरू करण्यात आल्याचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी सांगितले.
राज्य शासनाच्या आदेशानंतर जिल्ह्यात 7 नोव्हेंबरपासून सर्व संबंधित कार्यालयात कुणबी नोंदी शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे. राज्य शासनाने निश्चित केलेल्या कार्यालयाकडील संबंधित दस्तऐवजातून या नोंदी शोधण्यात येत आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत सुमारे 15 हजारांहून अधिक कुणबीच्या नोंदी आढळून आल्या आहेत.
शोध मोहिमेत आढळून येणार्या नोंदी सर्वसामान्य नागरिकांना उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर (वेबसाईट) या सर्व नोंदी स्कॅनिंग करून ठेवल्या जाणार आहेत. त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर संकेतस्थळावर या नोंदी नागरिकांना पाहता येणार आहेत.
संकेतस्थळावर नोंदी (records) पाहता येणार असल्याने संबंधित नागरिकांना त्याचा फायदा होणार आहे. तालुकानिहाय, गावनिहाय या नोंदी पाहता येणार आहेत. त्यामुळे संबंधितांना आपल्या नोंदी आहेत की नाही हे समजेल. त्याद्वारे नोंदीच्या प्रमाणित नकला कार्यालयात उपलब्ध करून घेता येणार आहेत. या नोंदीचा कुणबी जात प्रमाणपत्र काढण्यासाठी उपयोग होणार आहे.