विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी!

शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) पदवी, पदव्युत्तर पदवी प्रमाणपत्राची पडताळणीची प्रक्रिया आता अधिक सोपी होणार आहे. त्यासाठी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड (QR Code Certificate) देऊन त्याद्वारे पडताळणी करण्याची नवी सुविधा विद्यापीठ उपलब्ध करून देणार आहे.

पुढील वर्षीच्या दीक्षान्त समारंभापासून क्यूआर कोड असलेली प्रमाणपत्रे विद्यार्थ्यांना मिळणार आहेत. पदवीचे दुबार (डुप्लिकेट) प्रमाणपत्र एकदा देण्याची अट देखील रद्द झाली आहे. नोकरी, उच्च शिक्षणासाठी पदवीची पडताळणी केली जाते.

सध्या ती प्रक्रिया ऑफलाईन स्वरूपात आहे. ही प्रक्रिया कमी वेळेत करण्याचे विद्यापीठाचे प्रयत्न सुरू होते. विद्यार्थी हितासाठी याबाबत अधिसभा सदस्य ॲड. अभिषेक मिठारी यांनी कुलगुरू डॉ. दिगंबर शिर्के आणि प्रशासनाकडे पाठपुरावा केला. त्यांनी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देण्यासह पदवीचे दुबार प्रमाणपत्र एकदाच घेण्याची अट शिथिल करण्याची मागणी केली. त्यावर सकारात्मक कार्यवाही विद्यापीठाच्या पदवीदान आणि संगणक विभागाने केली.

त्यानुसार पदवी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला. शासकीय, निमशासकीय, खासगी संस्थांच्या पातळीवर शुल्क आकारणी वेगळीवेगळी असल्याने त्यात त्रुटी राहू नये. यंदाच्या प्रमाणपत्राची छपाई पूर्ण झाली आहे, त्यामुळे क्यूआर कोड पुढील वर्षीच्या ६१ व्या दीक्षान्त समारंभावेळी पदवी प्रमाणपत्रावर दिला जाणार आहे.

विद्यार्थ्यांकडून पदवी प्रमाणपत्र गहाळ झाल्यास आता फक्त एकदाच दुबार प्रमाणपत्र मिळते. शिवाय त्यासाठी शंभर रुपयांच्या स्टॅम्पवर ॲफिडेव्हिट (प्रतिज्ञापत्र) करावे लागते. पोलिस ठाण्यात एफआरआय द्यावी लागते. मात्र, आता त्यातील ॲफिडेव्हिट आणि एकदा प्रमाणपत्र देण्याची अट दंडक समितीने रद्द केली आहे. या दोन्ही निर्णयामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.

पदवी प्रमाणपत्रावर क्यूआर कोड उपलब्ध करून दिल्याने आणि प्रमाणपत्र केवळ एकदाच मिळण्याचा नियमही रद्द होणार असल्याने विद्यार्थ्यांचा त्रास कमी होणार आहे. हरवलेल्या प्रमाणपत्राबाबत एफआयआर नोंद करण्याची सक्ती अधिकार मंडळांच्या माध्यमातून रद्द करण्यासाठी पाठपुरावा करणार आहे.

-ॲड. अभिषेक मिठारी, अधिसभा सदस्य

क्यूआर कोडमुळे ऑनलाईन स्वरूपात थेट शिवाजी विद्यापीठाच्या (Shivaji University) संगणक प्रणालीतून पदवी प्रमाणपत्राची पडताळणी होणार आहे. पुढील टप्प्यात प्रमाणपत्र डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून दिले जाणार आहे.

-डॉ. दिगंबर शिर्के, कुलगुरू

पदवीच्या प्रत्येक प्रमाणपत्रावर कोड

प्रत्येक विद्यार्थ्याच्या पदवी प्रमाणपत्रावर वरच्या बाजूला क्यूआर कोड दिला जाणार आहे. संबंधित स्कॅन केल्यानंतर त्या प्रमाणपत्राची पडताळणी ऑनलाईन होणार आहे. त्यात विद्यार्थ्याचे नाव, पीआरएन नंबर, विषय, उत्तीर्णतेचे वर्ष आदी माहिती क्षणात मिळणार आहे. नोकरी, उच्च शिक्षणासाठी या प्रमाणपत्राची पडताळणी प्रक्रिया सोपी आणि वेगवान होणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी सांगितले. क्यूआर कोडचा निर्णय आता झाला. त्यापूर्वी यंदाच्या ५० हजार प्रमाणपत्राची छपाई पूर्ण झाली आहे. त्यामुळे प्रमाणपत्रावर क्यूआर कोड देण्याची कार्यवाही पुढील वर्षीच्या दीक्षान्त समारंभापासून होईल, असे त्यांनी सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *