कुणबी दाखले योग्य असतील, तर ओबीसी दाखले द्यावेच लागतील
कुणबी दाखले योग्य आणि कायदेशीर असतील, तर त्यांना ओबीसी दाखले (Certificates) द्यावेच लागतील, असे वैद्यकीय शिक्षणमंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सोमवारी सांगितले.
निढोरी (ता. कागल) येथे पत्रकारांशी बोलताना कुणबी प्रमाणपत्रांबाबत नेमलेली न्या. शिंदे समिती रद्द करण्याची भुजबळ यांची मागणी असेल, तर त्याबद्दल मंत्रिमंडळात चर्चा व्हायला पाहिजे, असेही त्यांनी सांगितले.
अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी न्या. शिंदे समितीबाबत केलेल्या वक्तव्याविषयी विचारता मुश्रीफ म्हणाले, भुजबळांनी पहिल्यापासून मराठा आरक्षणाला पाठिंबा दिला आहे. जे कुणबी दाखले देत आहेत, त्याबद्दल त्यांची मते वेगळी आहेत. कुणबी दाखले योग्य पद्धतीने दिले असतील आणि कायदेशीर असतील, तर त्यांना ओबीसीचा दाखला (Certificates) द्यावाच लागेल. हे योग्य की अयोग्य ठरविण्याचा अधिकार कोणाला, जातपडताळणी समितीला आहे.