अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यासाठी कोटींचा निधी मंजूर
श्री अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी हिवाळी अधिवेशनात गुरुवारी 40 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली. आराखड्यांतर्गत पहिल्यांदाच एवढ्या मोठ्या प्रमाणात निधीची (funding) तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे तीर्थक्षेत्र विकासाला चालना मिळणार आहे. विकास आराखडा एकूण 79 कोटी 96 लाखांचा असून त्यापैकी यापूर्वी 10 कोटी 70 लाख निधी मंजूर झाला आहे.
कोल्हापूर शहरातील अंबाबाई मंदिरात दर्शनासाठी दररोज देशभरातून मोठ्या प्रमाणात भाविक येत असतात. दररोज सुमारे 20 ते 25 हजार तर नवरात्रौत्सवात सुमारे 15 लाखांवर भाविक येतात.
त्याबरोबरच कोल्हापूर हे पर्यटन क्षेत्र म्हणून नावारूपास आल्याने पर्यटकही येतात. दिवाळी सुट्टी आणि उन्हाळी सुट्टीमध्ये भाविक व पर्यटकांनी कोल्हापूर भरलेले असते. परंतु भाविक व पर्यटकांना त्या प्रमाणात मूलभूत सोयी-सुविधांची वानवा आहे. त्यामुळे महापालिकेने श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखडा तयार करून निधीसाठी राज्य शासनाला सादर केला होता. 26 फेब—ुवारी 2019 रोजी राज्य शासनाने आराखड्याला मंजुरी दिली. त्यानंतर 11 मार्च 2022 ला 25 कोटींची तरतूद करण्यात आली होती. मात्र टप्प्याटप्प्याने निधी देण्यात येत आहे.
दरम्यान, तीर्थक्षेत्र आराखड्यांतर्गत मिळालेल्या निधीतून (funding) सरस्वती टॉकीजजवळ बहुमजली पार्किंग बांधण्यात येत आहे. आता ही इमारत सात मजली होणार आहे. 236 चारचाकी वाहनांचे पार्किंग असेल. त्याबरोबरच भक्त निवासात 47 खोल्या, 4 डॉरमेट्री, 50 लोकांसाठी उपाहारगृह आणि 200 भाविकांची राहण्याची सोय असणार आहे. इमारतीची उंची 24 मीटरपर्यंत असेल. 5 फेब्रुवारी 2020 रोजी काम सुरू झाले. वर्षभरात काम पूर्ण करावयाचे होते. मात्र अद्यापही काम अपूर्ण आहे.
अंबाबाई मंदिर व परिसर विकास आराखडा हा 2008 सालात 190 कोटींचा होता. 2013 सालात हा आराखडा महापालिका सभागृहात मंजूर करण्यात आला. त्यानंतर दरसूचीतील बदलामुळे आराखडा 190 कोटीवरून 220 कोटींचा झाला. 2014-2015 मध्ये आराखडा 255 कोटींवर गेला. 2015 सालात फेरप्रस्ताव करून तीन टप्प्यांत राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार 79 कोटी 96 लाखांच्या पहिल्या टप्प्याला मंजुरी देण्यात आली. 11 मार्च 2022 मध्ये आराखड्यासाठी 25 कोटींची तरतूद केली होती. परंतु त्यापैकी 29 मार्च 2023 मध्ये फक्त 2 कोटी 50 लाख इतका निधी मंजूर झाला. तो निधी अद्यापही महापालिकेकडे वर्ग झालेला नाही. आता पुन्हा 40 कोटींची तरतूद केल्याने आराखड्यांतर्गत 65 कोटींची तरतूद झाली. मात्र केवळ 10 कोटी 70 लाख इतका निधी मंजूर झाला आहे.
व्हीनस कॉर्नरला पार्किंगमुळे गैरसोय टळेल : चंद्रकांत पाटील
2014 ते 2019 दरम्यान अंबाबाई मंदिर तीर्थक्षेत्र आराखडा अंतिम करण्यात आला होता. सरकारने या आराखड्यासाठी भरीव तरतूद केली आहे. कोल्हापूरचा माजी पालकमंत्री म्हणून मलाही त्याचे समाधान आहे. आता निधीची तरतूद झाल्याने ही कामे होतील. भाविकांना अधिक सुविधा मिळतील. व्हीनस कॉर्नरला होणार्या पार्किंगमुळे मंदिर परिसरातील गर्दी टाळता येईल, असे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.