राधानगरी-भुदरगडमध्येही ‘आमचं ठरलंय’?

‘बिद्री’च्या निवडणुकीनंतर (election) राजकारणाला लगेचच कलाटणी मिळाली आहे. स्वागत आणि सत्कार समारंभात के. पी. पाटील यांनी राधानगरी भुदरगडच्या आमदारकीचा उल्लेख करून आम्हाला ताकद द्या, असे मुश्रीफ यांना सांगितले, तर तुम्ही सांगाल ती राजकीय भूमिका घेऊ, असे सतेज पाटील यांना सांगितले. कोल्हापूर लोकसभेप्रमाणे आता राधानगरी-भुदरगडमध्येही ‘आमचं ठरलंय’चा ट्रेंड पाहायला मिळणार का, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

‘बिद्री’च्या निवडणुकीत हसन मुश्रीफ, सतेज पाटील यांनी केलेल्या जोडण्या यशस्वी झाल्याच्या पार्श्वभूमीवर के. पी. पाटील यांनी बुधवारी हसन मुश्रीफ व गुरुवारी सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. मात्र, या कार्यक्रमातील त्यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळात भुवया उंचावल्या आहेत.

यापूर्वीच्या निवडणुकीत विरोधात असलेले दिनकरराव जाधव, राहुल देसाई हे आता आपल्याबरोबर आहेत. त्यामुळे आमची एकजूट झाली आहे. या नव्या जोडणीला ताकद द्या आणि राधानगरी-भुदरगडचा उमेदवार एकमताने ठरवा. त्याला आम्ही निवडून आणू, असे के. पी. पाटील यांनी हसन मुश्रीफ यांना कागलच्या गैबी चौकातील जाहीर सभेत सांगितले.

गुरुवारी के. पी. पाटील यांनी सतेज पाटील यांची भेट घेऊन त्यांचा सत्कार केला. या निवडणुकीत (election) सतेज पाटील यांनी ज्या काही जोडण्या लावल्या होत्या, त्या यशस्वी ठरल्या. त्या पार्श्वभूमीवर के. पी. यांनी कृतज्ञता व्यक्त करताना यापुढे तुम्ही जी राजकीय भूमिका सांगाल, ती घेऊन राधानगरी-भुदरगडचा आमदार विजयी करू, असे के. पी. पाटील यांनी सांगितले.

आम्हाला कायमस्वरूपी पाठिंबा द्या. तुम्ही सांगाल ती राजकीय भूमिका घेऊ आणि राधानगरी-भुदरगडचा आमदार तुम्ही सांगाल तो विजयी करू, असे सांगून के. पी. पाटील यांनी राजकीय वर्तुळात खळबळ उडवून दिली आहे.

‘बिद्री’च्या विजयानंतर के. पी. पाटील हे विधानसभेचे प्रबळ दावेदार म्हणून पुढे येतील, असे सांगितले जात होते. दोन दिवसांतील त्यांचे वक्तव्य हे याला पुष्टी देणारेही आहे. के. पी. पाटील मुश्रीफ यांचे निकटवर्तीय असले, तरी मुश्रीफ आता महायुतीच्या घटक पक्षातील नेते असल्याने त्यांना प्रकाश आबिटकर यांची साथ करावी लागेल. तेथे संधी नसल्याने के. पी. पाटील हे सतेज पाटील यांच्या पाठिंब्याने काँग्रेसचे उमेदवारही होऊ शकतात. त्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर लोकसभेप्रमाणे राधानगरी-भुदरगडमध्येही ‘आमचं ठरलंय’चा प्रयोग होणार का, याची चर्चा के. पी. पाटील यांच्या वक्तव्याने सुरू झाली आहे.

ए. वाय. यांना सोबत घेण्यात आबिटकर यशस्वी पण…

राधानगरी-भुदरगडमध्ये शिवसेनेचे प्रकाश आबिटकर हे आमदार आहेत. ते सध्या शिंदे गटात आहेत. गेल्या सलग दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या आहेत. ‘बिद्री’च्या निवडणुकीत अत्यंत ताकदीने ते लढले. विशेषतः के. पी. पाटील यांचे मेहुणे ए. वाय. पाटील यांना आपल्यासोबत घेण्यात ते यशस्वी ठरले; पण अपेक्षित प्रतिसाद त्यांना मिळाला नाही आणि संपूर्ण पॅनेल पराभूत झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *