पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली कोटींची वर्क ऑर्डर
निधी मंजूर असूनही विकासकामे होत नाहीत. नागरिकांना पिण्यासाठी पाणी मिळत नाही. लोक टीका करत आहेत. कमिशन यायचे आहे म्हणून काम थांबले, अशी चर्चा सुरू आहे. यात आमचा काय संबंध! पालकमंत्र्यांच्या नावाने आरोप होत आहेत. आयुक्तांना चार-चार वेळा सांगूनही कामे सुरू नाहीत. अधिकार्यांनी गांभीर्याने घ्यावे, अशा शब्दांत पालकमंत्री (Guardian Minister) हसन मुश्रीफ यांनी महापालिका अधिकार्यांना खडे बोल सुनावत 100 कोटींच्या रस्त्याची वर्क ऑर्डर तत्काळ द्या, असे आदेश शनिवारी सकाळी दिले. त्यावर महापालिका प्रशासनाने गतीने कार्यवाही करत रात्री या कामांची वर्क ऑर्डर दिली.
थेट पाईपलाईन पूर्णत्वासाठी माझाच पायगुण चांगला
कसबा बावडा, लाईन बाजार येथे सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे लोकार्पण पालकमंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते झाले. यावेळी ते म्हणाले, 7 ऑक्टोबरला मी पालकमंत्री झालो. त्यानंतर जनता दरबार भरवून शासन दरबारी असलेले नागरिकांचे विविध प्रश्न मार्गी लावले. श्री अंबाबाई तीर्थक्षेत्र विकास आराखड्यासाठी 40 कोटी निधीची तरतूद केली. मी पालकमंत्री झाल्यानंतरच थेट पाईपलाईन पूर्ण झाली हा माझाच पायगुण, शुभलक्षण आहे. पूर्ण झालेल्या थेट पाईपलाईनची काय भानगड आहे? अजूनही पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा का सुरू केला नाही?, लोकांना प्यायला पाणी मिळणार नसेल, तर आम्हाला चांगले कसे म्हणतील? राज्य शासनाचीही बदनामी होत आहे. तांत्रिक बाबी महापालिका अधिकार्यांना समजत नसतील, तर दुसरे तज्ज्ञ घ्या. पण, गांभीर्याने घ्या.
शंभर कोटींच्या रस्त्यांची वर्क ऑर्डर तत्काळ द्या
कोल्हापूर शहरातील रस्ते खड्ड्यांनी भरले आहेत. शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत आहे. पॅचवर्कची कामे सुरू करण्याबरोबरच 100 कोटींच्या रस्त्यांची वर्क ऑर्डर द्या म्हणून चारवेळा सांगितले. तरीही अद्याप वर्क ऑर्डर का दिली नाही? कमिशन यायचे आहे म्हणून काम थांबले, अशी चर्चा माझ्या नावाने सुरू आहे. दिवाळीपूर्वी खड्डे बुजवा म्हणून सांगितले होते. त्याचेही काही झाले नाही, असे म्हणून (Guardian Minister) मुश्रीफ यांनी अधिकार्यांना झापले. खड्ड्यांमुळे हाडे खिळखिळी होत असल्याने हाडांचे दवाखाने काढा, असे लोक म्हणत आहेत. लोकांनी किती सहन करायचे? आजच्या आज 100 कोटींच्या रस्त्यांची वर्क ऑर्डर देऊन त्वरित काम सुरू करा, असे आदेशही मुश्रीफ यांनी प्रशासक मंजुलक्ष्मी यांना दिले.
कोल्हापुरातील विकासकामासाठी 20 कोटी
कोल्हापूर शहरातील विविध विकासकामांसाठी 20 कोटी निधी दिला आहे. परिख पुलाजवळ रेल्वे फाटक येथे पादचारी उड्डाणपूल बांधण्यासाठी 3 कोटी 82 लाख रु. मंजूर केले असून, त्याची निविदा प्रक्रिया सुरू आहे. खासबाग मैदानातील पडलेली भिंत बांधण्यासाठी 50 लाख निधी दिला. दलित वस्ती योजनेंतर्गत महापालिकेला 8 कोटी मंजूर केले आहेत, असेही मुश्रीफ यांनी सांगितले.
नाहीतर आडसूळ यांना बदला…
झूम प्रकल्पातील कचर्यासंदर्भात वर्क ऑर्डर देण्यासाठी सांगितले. पण, अद्याप काम सुरू झालेले नाही. ही पद्धत बरोबर नाही. चार-आठ दिवसांत काम चालू झाले पाहिजे. नाहीतर अतिरिक्त आयुक्त आडसूळ यांना बदला. ग्रामविकास खात्यातून मीच त्यांना महापालिकेत आणले आहे, असेही पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले. तसेच प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी प्रलंबित प्रश्न तत्काळ मार्गी लावावेत, असे आदेशही त्यांनी दिले.
क्रॉस कनेक्शनसाठी पाणीपुरवठा खंडित
कोल्हापूर शहरातील 100 कोटींच्या रस्त्यासाठी आजच वर्क ऑर्डर देण्याचे आदेश अधिकार्यांना दिले आहेत. थेट पाईपलाईनचे दोन पंप सुरू झाले आहेत. थेट पाईपलाईनचे पाणी संपूर्ण शहरात जाण्यासाठी त्या-त्या ठिकाणी क्रॉस कनेक्शन करून जलवाहिन्या जोडण्यात येत आहेत. त्यामुळे पाणी पुरवठा खंडित होत आहे. तिसरा पंप सुरू झाल्यानंतर शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा केला जाईल, असे प्रशासक मंजुलक्ष्मी यांनी सांगितले.
रात्री 8 वाजता दिली वर्क ऑर्डर
शहरात 100 कोटी खर्चून केल्या जाणार्या रस्त्यांची रात्री 8 वाजता कंत्राटदाराला वर्क ऑर्डर देण्यात आली. लवकरच आता रस्त्याची कामे सुरू होणार आहेत.