“गांधीनगरमध्ये कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार”
गांधीनगरमध्ये सुरु असलेल्या गुटखा विक्रीविरोधात मंगळवारी (दि. १९) करवीर शिवसेना-ठाकरे गटाच्या नेत्यांनी अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना धारेवर धरले. अन्न व प्रशासन विभाग कोल्हापूर कार्यालयावर मंगळवारी (दि. १९) धडक मोर्चा काढत गुटखा विक्रेत्यांची कार्यशाळा घेणाऱ्या संबंधित अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई (action) व्हावी अशी मागणी यावेळी करवीर शिवसेनेकडून करण्यात आली. यावेळी करवीर शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव, तालुका प्रमुख विनोद खोत,उंचगाव गावप्रमुख दिपक रेडेकर, कामगार सेना जिल्हाप्रमुख राजू सांगावकर, उपतालुकाप्रमुख राहुल गिरुले, युवासेना तालुकाप्रमुख योगेश लोहार, गांधीनगर विभागप्रमुख दिपक पोपटानी, पै. बाबुराव पाटील, अजित चव्हाण, किशोर कामरा आदी शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.
करवीर शिवसेना-ठाकरे गटाकडून मंगळवारी (दि. १९) अन्न व प्रशासन विभाग कोल्हापूर कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी सहाय्यक आयुक्त प्र.प्र. फावडे यांना गांधीनगरमध्ये सुरु असलेल्या अवैध गुटखा विक्रीसंबंधी एक निवेदन देण्यात आले. यावेळी डी. एम. शिर्के, सहाय्यक आयुक्त हे उपस्थित होते. तसेच जिल्हा पोलीस प्रमुखांनाही या निवेदनाची प्रत देण्यात आल्याचे शिवसेना ठाकरे गटाकडून सांगण्यात आले आहे.
या निवेदनात दिलेल्या माहितीनुसार, गांधीनगरमध्ये अन्न औषध प्रशासनाच्या एका अधिकाऱ्यांने बैठक घेतली व त्यांना मार्गदर्शन केले. गांधीनगरसारख्या भागात सुरु असलेल्या अशा बैठकीला विरोध करत संबंधित अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई (action)
करण्यात यावी अशी मागणी शिवसेना नेत्यांनी केली. तसेच बैठक घेणाऱ्या अन्न व औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्याची चौकशी करुन करवीर शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने दिलेला हार घालून त्याचा प्रशासनाने सत्कार करावा, असे म्हणत फुलांचा हार सहा. आयुक्त अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात आला.
कारवाई करा अन्यथा तीव्र आंदोलन करणार : राजू यादव यांचा इशारा
यावेळी करवीर शिवसेना तालुकाप्रमुख राजू यादव म्हणाले की, शासनाने बंदी घातलेल्या गुटख्याची विक्री कशी करावी याची कार्यशाळा गांधीनगरसारख्या भागात घेतली जात आहे. ही संतापजनक बाब आहे. समाजात तरुणाईसह विविध घटकांवर याचे दुष्परिणाम होणार आहेत. अन्न व औषध प्रशासन विभागाने यावर दुर्लक्ष करु नये. त्यामुळे अवैध गुटखा विक्रीसंबंधी बैठक घेणाऱ्या अधिकाऱ्याचा आम्ही दिलेला हार घालून सत्कार करावा अशी मागणी यादव यांनी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यावर योग्य ती कारवाई झाली नाही तर तीव्र आंदोलन करू असा इशारा देखील राजू यादव यांनी दिला.