जिल्ह्यातील ५५० दूध संस्थांवर येणार प्रशासक
वर्षभरापूर्वी नोटिसा देऊनही निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण न करणार्या जिल्ह्यातील 550 दूध संस्थांवर कारवाई करण्यात येणार आहे. पुढील महिन्यापासून या संस्थांची बँक खाती गोठविण्याचे आदेश सहायक दुग्ध निबंधक कार्यालयाकडून गोकुळ दूध संघाला दिले आहेत. यातूनही जर मतदारयाद्या सादर झाल्या नाहीत; तर प्रशासक (administrator) नेमणुकीचे आदेश देण्यात येतील, असा इशारा सहायक दुग्ध निबंधक प्रदीप मालगावे यांनी दिला आहे.
सहकारी संस्थांच्या निवडणुकीतील सहावा टप्पा सुरू झाला होता, त्यावेळी दुग्ध विभागाने सर्व संस्थांना नोटिसा पाठवून निवडणूक घेण्यासाठी पुढील प्रक्रिया पूर्ण करा, असे आदेश दिले होते. जिल्ह्यातील सुमारे 1,800 ते 1,900 संस्थांना अशा नोटिसा गेल्या आहेत. यातील वर्षभरात एक हजार संस्थांची निवडणूक पूर्ण झाली आहे. दोनशे दूध संस्थांची प्रक्रिया सुरू आहे; तर 550 संस्थांचे अध्यक्ष, सचिव नोटीस मिळाल्यानंतर दुग्ध विभागाच्या कार्यालयाकडे फिरकलेही नाहीत. यासाठी वरिष्ठ अधिकार्यांनी संस्था सचिवांना वारंवार कल्पना देऊन मतदारयाद्या सादर करा, अशा तोंडी सूचनाही दिल्या आहेत; पण अनेकांनी त्याची दखलही घेतलेली नाही. दरम्यान, प्रशासक (administrator) लागू करण्याच्या कारवाईमुळे काही संस्थाचालकांनी धावाधाव सुरू केली आहे.
प्राधिकरणाचे असेही आदेश
ज्या दूध संस्था मतदारयाद्या सादर करणार नाहीत, अशा संस्थांवर कारवाई करण्याचे आदेश राज्य सहकार निवडणूक प्राधिकरण यांनी दुग्ध विभागाला दिले आहेत. यामुळे ज्या संस्था तत्काळ निवडणुकीसाठी मतदारयादी सादर करणार नाहीत, त्या संस्थांवर प्रशासक किंवा अवसायक लागू करण्याची कारवाई केली जाणार आहे.
संस्था हातातून बाहेर जाईल अशी भीती
नावालाच काढलेली संस्था, विरोधकांचा संस्थेत शिरकाव होईल, अशी भीती. हातून संस्था जाईल, गैरकारभार उघडकीस येईल, ठराव आपल्याकडेच राहिला पाहिजे, या भूमिकेतूनच संस्थाचालक निवडणूक घेण्याच्या फंदात पडत नाहीत.