“…….तर कोल्हापूर, सांगली शहरांचे अस्तित्वच संपेल”
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या आणि उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनी पुन्हा एकदा ‘अलमट्टी’ची (dam) उंची पाच मीटरने वाढविण्याचा घाट घातला आहे; मात्र ‘अलमट्टी’ची उंची वाढल्यास पंचगंगा आणि कृष्णा नदीची पूर पातळी अनुक्रमे 72.9 आणि 74 फुटांनी वाढेल आणि जलप्रलयामुळे कोल्हापूर, सांगली शहरांचे अस्तित्वच संपेल. त्यामुळे कर्नाटकच्या या प्रयत्नांना राजकीय, प्रशासकीय आणि न्यायालयीन पातळीवर विरोध करण्याची आवश्यकता आहे.
1963 मध्ये अलमट्टी धरणाला मंजुरी मिळाली, तेव्हा त्याची उंची 500 मीटर एवढीच निश्चित करण्यात आली होती. मात्र, तेवढ्या उंचीलाही राज्याच्या तत्कालीन पाटबंधारे सचिवांनी हरकत घेतली होती. त्यानंतर पाण्याच्या आवश्यकतेसह अन्य वेगवेगळी कारणे देत कर्नाटकने या धरणाची उंची हळूहळू 505 मीटर, 512 मीटर आणि 519.6 मीटरपर्यंत वाढवत नेली.
2005 मध्ये अलमट्टी धरणाची (dam) उंची 519.6 मीटरपर्यंत वाढविण्यात आली आणि या धरणाच्या वाढत्या उंचीचे भयावह परिणाम समोर आले. 2005 मध्ये सांगली-कोल्हापूर जिल्ह्यांत ‘अलमट्टी’च्या बॅकवॉटरमुळे प्रचंड महापूर आला. 2019 आणि 2021 च्या महापुराने तर अलमट्टी आणि इथला महापूर यांचा परस्परसंबंध अधोरेखितच केला. त्यामुळे देशभरातील, राज्यातील आणि अनेक स्थानिक जलतज्ज्ञांनीही इथल्या महापुराला ‘अलमट्टी’चे बॅकवॉटरच कारणीभूत ठरत असल्याचा निष्कर्ष काढून तो राज्य शासनाला कळविला. त्यानंतर महापूर आणि ‘अलमट्टी’चा परस्पर संबंध अभ्यासण्यासाठी नेमलेल्या नंदकुमार वडनेरे समितीने अभ्यास न करता घाईगडबडीने काढलेला निष्कर्ष सध्या कर्नाटकच्या पथ्यावर पडत आहे.
त्या त्या वेळच्या महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांच्या उदासीनतेमुळे आणि निष्काळजीपणामुळे अलमट्टीची उंची वेळोवेळी वाढत गेली आणि आता, तर अलमट्टीची आणखी वाढू पाहणारी उंची कृष्णा-पंचगंगाकाठावरील शेकडो गावांना कायमस्वरूपी बुडवायला निघालेली आहे. 2019 च्या महापुरावेळी कोल्हापूर जिल्ह्यातील राजाराम बंधार्यावरील पाणी पातळी होती 546 मीटर आणि सांगलीतील आयर्विन पुलावरील पाणी पातळी होती 545 मीटर (समुद्रसपाटीपासून). यावेळी या दोन्ही ठिकाणची प्रत्यक्षातील पाणी पातळी होती अनुक्रमे 56.5 फूट आणि 57.6 फूट! या एवढ्या पाणी पातळीवेळी निम्मे कोल्हापूर आणि सांगली शहर पाण्याखाली गेले होते. याशिवाय कृष्णा, पंचगंगा आणि वारणा नदीकाठावरील शेकडो गावे जवळपास महिनाभर जलमय झाली होती. याशिवाय दोन्ही जिल्ह्यांतील हजारो हेक्टर शेती पार उद्ध्वस्त झाली होती.
आता कर्नाटकने अलमट्टीची उंची 524.256 मीटरपर्यंत (आणखी 16 फूट 4 इंच) वाढविण्याची सिद्धता केली आहे. तसे झाल्यास आणि पुन्हा महापूर आल्यास सांगलीतील पाणी पातळी होईल 74 फूट आणि कोल्हापुरातील पाणी पातळी होईल 72.9 फूट! अशी परिस्थिती निर्माण झाली, तर सांगली आणि कोल्हापूर या दोन्ही शहरांचे अस्तित्व तरी राहील काय? कृष्णा-वारणा-पंचगंगाकाठावरील छोट्या-मोठ्या गावांचे अस्तित्व तर अलमट्टीच्या डोहातच शोधावे लागेल. अलमट्टीच्या वाढत्या उंचीमुळे भविष्यात एवढे भयावह संकट सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यांवर कोसळू शकते. त्यामुळेच महाराष्ट्रातील राज्यकर्त्यांनी आणि या दोन जिल्ह्यांतील शेतकरी, व्यापारी, व्यावसायिक आणि सर्वसामान्य नागरिकांनी एकजुटीने अलमट्टीच्या वाढत्या उंचीला निकराचा विरोध करण्याची आवश्यकता आहे.
‘अलमट्टी’ आणि महापुराच्या संबंधांचे ढीगभर पुरावे!
टाटा इन्स्टिट्यूटच्या एका तज्ज्ञ समितीने 2012 मध्ये कृष्णा आणि पंचगंगा खोर्याचा सखोल अभ्यास करून इथल्या महापुराला अलमट्टी धरणाचे बॅकवॉटरच कारणीभूत असल्याचा निष्कर्ष काढला आहे. या समितीने आपला अहवाल राज्य शासनाला सादर केला आहे; पण नेहमीप्रमाणे राज्य शासन आणि तत्कालीन राज्यकर्ते निद्रिस्तच राहिले. या अहवालापाठोपाठ साऊथ आशिया नेटवर्क ऑफ डॅम्स अँड रिव्हर्स या संस्थेनेही या भूभागाचा आणि महापूर परिस्थितीचा अभ्यास करून सांगली-कोल्हापूरमधील महापुराला ‘अलमट्टी’चे बॅकवॉटरच कारणीभूत असल्याचा निर्वाळा दिला, तरीही राज्य शासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी निद्रिस्तच आहेत.