सिंधुदुर्गनंतर कोल्हापुरात आढळला कोरोनाबाधित रुग्ण
‘‘राज्यात जेएन. १ कोरोनाचा (JN. 1 Corona) शिरकाव झाला आहे. यापाठोपाठ काल (गुरुवार) कोल्हापुरातही एक तरुण कोरोनाबाधित सापडला आहे. त्याला घरात क्वारंटाईन केले आहे. तो कोरोनाबाधित आहे; जेएन. १ ची लागण नाही. लोकांनी घाबरून न जाता मास्कचा वापर करावा,’’ अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक (Health Department) डॉ. सुप्रिया देशमुख यांनी दिली.
आयसोलेशनमध्ये चाचणी झाली; तेव्हा त्याचा अहवाल कोरोनाबाधित आला. त्याला घरीच क्वारंटाईन केले आहे. त्याची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, त्याच्या थुंकीचा नमुना राष्ट्रीय विषाणू प्रयोगशाळेकडे पाठवला आहे. त्याचा अहवाल दोन दिवसांत येणार आहे.
जिल्ह्यात ३३ लाख लोकांना कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण झाल्याने कोरोनाचा धोका टळला आहे. असे असले तरी ज्यांना गंभीर आजार आहेत, अशा व्यक्तींना कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. अशा व्यक्तींनी जास्त खबरदारी घेण्याची गरज असल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे.
वैद्यकीय अधीक्षक (Health Department) डॉ. शिशीर मिरगुंडे म्हणाले, ‘‘कोरोनाचा जेएन. १ व्हेरिएंट वेगाने पसरणारा असला, तरी तो जीवघेणा नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही. सीपीआरमध्ये कोरोना उपचारासाठी स्वतंत्र कक्ष आहे. ३५ आयसीयू बेड आहेत. चाचणीसाठी जिल्हा प्रयोगशाळा आहे. वैद्यकीय तज्ज्ञांचे पथक येथे आहे. औषध साठाही पुरेसा आहे. त्यामुळे लक्षणे दिसताच रुग्णांनी घाबरून न जाता तातडीने तपासणी व उपचार घ्यावेत.
अशी घ्या दक्षता!
गर्दीची ठिकाणे टाळा
मास्कचा वापर करावा
लक्षणे दिसताच वैद्यकीय तज्ज्ञांचा सल्ला व उपचार घ्यावेत