‘कोल्हापूरच्या हद्दवाढीची लवकरच घोषणा’; ‘या’ गावांचा असणार समावेश
शहरालगत असलेली सहा गावे पहिल्या टप्प्यात घेऊन लवकरच हद्दवाढ (limit increase) करण्यात येईल. त्याचा आदेश काढण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा केली आहे. या आदेशाची घोषणा त्यांच्याकडून होईल, असे सांगत पालकमंत्री हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी हद्दवाढीबाबत पुनरुच्चार केला.
क्रॉस कनेक्शनचे काम गतीने पूर्ण करून १० जानेवारीपासून पूर्ण शहराला थेट पाईपलाईनचे पाणीपुरवठा करण्याचे नियोजन असल्याचे त्यांनी सांगितले. मुश्रीफ यांनी शहरातील पायाभूत सुविधांसह विविध विकासकामांचा आढावा शासकीय विश्रामगृह येथे महापालिकेच्या अधिकाऱ्यांसमवेतच्या बैठकीत घेतला. यावेळी आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त आयुक्त रविकांत आडसूळ, केशव जाधव, सहायक आयुक्त संजय सरनाईक, शहर अभियंता हर्षजित घाटगे, जल अभियंता नेत्रदीप सरनोबत आदी उपस्थित होते. त्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
मुश्रीफ म्हणाले, ‘‘महापालिका रस्ते, पाणी, बस आदी सुविधा या शहराजवळील सहा गावांना देत आहे. त्यामुळे हद्दवाढ झाली, तरच त्यांचा महापालिकेवर भार पडणार नाही. या गावांशिवाय हद्दवाढीत प्रस्तावित असलेल्या इतर गावांबाबत निर्णय लोकसभा, विधानसभा निवडणुकीनंतर होईल. हद्दवाढ होईपर्यंत शासनाकडून जादा निधी आणून शहर विकासासाठी प्रयत्न करणार आहे.’’
ते म्हणाले, ‘‘काळम्मावाडी थेट पाईपलाईन योजनेचे काम पूर्ण झाले आहे. दोन उपसा पंप सुरू आहेत. चंबुखडी येथे पाईपलाईनच्या क्रॉस कनेक्शनचे काम पूर्ण झाल्यानंतर पूर्ण शहराला थेट पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा केला जाईल. शहरातील सर्व ठिकाणी एकसारखे आणि योग्य दाबाने पाणीपुरवठा करण्यासाठी आयआयटी मुंबईच्या माध्यमातून सर्व्हे केला आहे. या पाईपलाईनमुळे १७६ एमएलडी पाणी उपसा होऊन त्याने सांडपाणीही वाढणार आहे.
४० एमएलडी सांडपाण्यावर प्रक्रिया करावी लागणार आहे. अमृत योजना टप्पा दोनच्या माध्यमातून ३३६ कोटी निधी मंजूर झाला आहे. त्यातून पाच एसटीपी प्रकल्प प्रस्तावित आहेत.’’ ‘अमृत’ एक, दोन पूर्ण झाल्यानंतर पंचगंगा नदी शंभर टक्के प्रदूषणमुक्त होईल. या योजनेच्या पहिल्या टप्प्यातील ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. सर्व कामे ३१ मार्चपर्यंत पूर्ण केली जातील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
काय म्हणाले मुश्रीफ?
ई-बससाठी बुद्ध गार्डनमध्ये चार्जिंग सेंटर ः पीएमई बस प्रकल्पातून केंद्र शासनाने शहराला १०० ई-बस मंजूर केल्या आहेत. त्यासाठी बुद्धगार्डनमधील वर्कशॉप येथे चार्जिंग सेंटर उभारले जाणार असून त्यासाठी १७ कोटी रुपये खर्च आहे.
शाहू स्मारक जागेबाबत बैठक ः छत्रपती शाहू मिलमधील स्मारकासाठी वस्त्रोद्योग महामंडळाकडून महापालिकेकडे जागा हस्तांतरीत करावी लागणार आहे. त्याबाबत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांच्यासमवेत लवकरच बैठक घेणार आहे.
अंबाबाई तीर्थक्षेत्र आराखड्यातून तीन मजली पार्किंग ः आराखड्यांतर्गत सरस्वती चित्रपटगृहासमोर बहुमजली पार्किंगचे काम अंतिम टप्प्यात आहे. त्यासाठी आणखी ४० कोटींचा निधी मंजूर झाला आहे. त्यातून तीन मजली पार्किंग, भक्त निवास उभारले जाणार आहे.
८८ मुख्य रस्ते भक्कम होणार ः शहरातील रस्त्यांची लांबी एकूण ११०० किलोमीटर आहे. १०० कोटींतून १९ किलोमीटरचे रस्ते होतील. २३९ कोटींच्या निधीमधून १३२ रस्त्यांची कामे होणार आहेत. १०४ कामे पूर्ण असून ८४ कामे सुरू आहेत. उर्वरित ८८ मुख्य रस्त्यांना ९० कोटींची गरज आहे. मुख्यमंत्र्यांकडे या निधीची मागणी केली आहे. निधी मिळाल्यानंतर ते रस्ते भक्कम होतील.
रोजंदारी कर्मचाऱ्यांबाबत बैठक ः रोजंदारी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करण्याबाबत प्रधान सचिवांसमवेत बैठक घेऊन चर्चा करणार आहे. घन कचरा व्यवस्थापनाचे काम निविदाअभावी थांबले असून त्यात आणि महापालिकेच्या शाळांमध्ये भौतिक सुविधा पुरविण्याकडे लक्ष देणार आहे.
क्षीरसागरांशी चर्चा करू!
शंभर कोटींच्या निधीतून होणारे रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन आणि थेट पाईपलाईनच्या कामाचे लोकार्पण मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्याची राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांची इच्छा आहे. या रस्त्यांच्या कामाची ऑर्डर निघाली आहे. खड्डेमय, खराब रस्त्यांबाबत नागरिकांमध्ये संतप्त भावना आहेत. त्यामुळे रस्त्यांच्या कामाची सुरुवात लवकर होणे आवश्यक आहे. थेट पाईपलाईनचे पाणी अद्याप संपूर्ण शहराला मिळत नाही. ते लवकरच मिळेल. त्यानंतर रस्त्यांच्या कामाचे उद्घाटन आणि थेट पाईपलाईनचे लोकार्पणाचा संयुक्त कार्यक्रम मुख्यमंत्र्यांच्या हस्ते घेण्याबाबत क्षीरसागर यांच्याशी चर्चा करणार असल्याचे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
हद्दवाढविरोधी समितीची आज बैठक
पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी सहा गावे घेऊन शहराची हद्दवाढ (limit increase) करणार असल्याचे आज जाहीर केले. त्यावर हद्दवाढीविरोधी कृती समितीने पुढील लढ्याची दिशा ठरविण्यासाठी आज (ता. ३०) सकाळी ११ वाजता हॉटेल पॅव्हेलियनमध्ये बैठक आयोजित केली आहे. समितीने म्हटले आहे की, कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, कंदलगाव, सरनोबतवाडी गावांचा हद्दवाढीत समावेश होणार आहे.
त्याचबरोबर दोन एमआयडीसी आणि ४१ गावांच्या हद्दवाढीबाबत लोकसभा निवडणुकीनंतर चर्चा होणार असल्याचे समजले आहे. सध्या हद्दवाढ विरुद्ध ज्या वीस गावांची एकी आहे, ती फोडण्याचा हा प्रयत्न आहे. हद्दवाढीला विरोध करण्यासाठी बैठकीत चर्चा करून पुढील लढ्याची दिशा ठरविली जाणार आहे. बैठकीला संबंधित गावांमधील सर्व सरपंच, उपसरपंच आणि पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहावे.
झूम प्रकल्पातील कचऱ्याचे बायोमायनिंग
राष्ट्रीय स्वच्छ हवा योजनेतून शहराला १६ कोटींचा निधी मिळाला आहे. दाभोळकर कॉर्नर येथे प्रायोगिक तत्त्वावर हवा स्वच्छ करणारी यंत्रणा बसविली आहे. झूम प्रकल्पातील अनेक वर्ष पडून असलेल्या एक लाख ६७ टन कचऱ्याचे बायोमायनिंग केले जाणार आहे. तेथे दररोज संकलित होणाऱ्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी नवीन प्रकल्प उभारला जाणार आहे. महिन्याभरात ‘झूम’मधील कचऱ्याचा डोंगर दूर होईल. कचरा उठावासाठी आणखी ३० टिप्पर खरेदी केले जातील, असे मंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.
या गावांचा समावेश शक्य
दरम्यान, हद्दवाढीत कळंबा, पाचगाव, मोरेवाडी, उचगाव, कंदलगाव, सरनोबतवाडी या गावांचा समावेश होण्याची शक्यता आहे.