आठ दिवसांत निर्णय न झाल्यास कारखाना गेटवर आंदोलन : आ. सतेज पाटील

श्री छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या (sugar factory) ऊस तोडणी व ऊस नोंदी घेण्यास अन्याय होत असल्याचा जाब विचारण्यासाठी आमदार सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली मंगळवारी प्रादेशिक सहसंचालक (साखर) कोल्हापूर विभागाच्या कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. अन्यायग्रस्त शेतकर्‍यांच्या ऊस तोड व नोंदीबाबत कारखान्याला तत्काळ कळविण्यात येईल, असे आश्वासन प्रादेशिक सहसंचालक (साखर) गोपाळ मावळे यांनी दिले. आठ दिवसांत निर्णय नाही झाला तर अन्यायग्रस्त शेतकर्‍यांसह स्वतः कारखान्याच्या गेटवर आंदोलन करण्याचा इशारा आ. सतेज पाटील यांनी यावेळी दिला.

शेती उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील विठ्ठल मंदिर येथे मंगळवारी सकाळी अन्यायग्रस्त शेतकरी एकत्र जमले. आ. सतेज पाटील यांच्या नेतृत्वाखाली तेथून प्रादेशिक सहसंचालक (साखर) यांच्या कार्यालयाकडे मोर्चा निघाला. यावेळी घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. कारखान्याची निवडणूक होऊन सहा महिने झाले. सत्तारूढ संचालक मंडळाने विरोधात मतदान केलेल्या पाच ते सहा हजार सभासदांना जाणूनबुजून त्रास देण्याच्या हेतूने उसाला तोडणी दिलेल्या नाहीत. शेती ऑफिसमधील कर्मचारीही ठोस माहिती देत नसून आम्हाला वरून आदेश आहे, असे मोघमपणे सांगून जादा माहिती देण्यास टाळाटाळ करतात. शेती विभागाच्या सर्कल ऑफिसमध्ये ऊस नोंदी ठेवलेल्या विरोधी गटाच्या सभासदांच्या नावापुढे विरोधक, असे स्पष्ट नोंद केल्याची तक्रार यावेळी करण्यात आली. कारखाना प्रशासन ऊस नेत नसल्यामुळे सभासद भीतीखाली असल्याचे निवेदनात म्हटले आहे.

यावेळी बाजार समितीचे सभापती भारत पाटील, गोकुळचे संचालक बाबासाहेब चौगले, बायाजी शेळके, डॉ. संदीप नेजदार, मोहन सालपे यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवेदनावर आमदार सतेज पाटील, सर्जेराव माने, किरण भोसले, बाबुराव बेनाडे, हंबीरराव वळके आदी ऊस उत्पादक सभासदांच्या सह्या आहेत.

यंत्रणा नसेल तर कारखान्याने (sugar factory) संबंधित सभासदांना त्यांच्या उसाची इतरत्र विल्हेवाट लावणेबद्दल कळवून त्याप्रमाणे ना हरकत पत्र देणे आवश्यक आहे. परंतु राजाराम कारखाना प्रशासन निव्वळ राजकीय हेतूने सभासदांची अडवणूक करून त्यांचा ऊस कारखान्यास गाळपासाठी आणत नाही. पुढील वर्षाच्या गळीत हंगामासाठी ज्या सभासदांनी ऊस पिकाच्या आडसाली/पूर्व हंगामी लागणी केल्या आहेत तसेच जे सभासद सुरू हंगामातील लागणी करत आहेत, त्यांच्या लागणी कारखाना प्रशासनाकडून नोंद करून घेतल्या जात नाहीत. याबाबत कारखाना प्रशासनास सक्त सूचना द्याव्यात; अन्यथा उग्र आंदोलन करावे लागेल, असा इशारा यावेळी प्रादेशिक सहसंचालक साखर यांना देण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *