‘राजाराम’च्या एम.डीं.ना मारहाण; नेजदारसह 8 अटकेत
कसबा बावडा येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक (एम.डी.) प्रकाश चिटणीस (वय 49, रा. शाहूनगर, हुपरी) यांना मारहाण केल्याप्रकरणी महापालिकेच्या स्थायी समितीचा माजी सभापती डॉ. संदीप नेजदार याच्यासह 15 जणांवर शाहूपुरी पोलिसांत बुधवारी पहाटे गुन्हा (case) दाखल झाला. निवडणुकीतील पराभवाचा राग मनात धरून कट रचून ठार मारण्याचा प्रयत्न केला. गळ्यातील दोन तोळ्यांची चेन व रोख रक्कम, असा सुमारे 1 लाख 1 हजार 10 रुपयांचा ऐवज लंपास केला, अशी फिर्याद चिटणीस यांनी दिली आहे.
या कारवाईत डॉ. संदीप विलास नेजदार (वय 50), बबलू विश्वास नेजदार (40), तुषार तुकाराम नेजदार (32), कौस्तुभ कमलाकर नेजदार (25), श्रीप्रसाद संजय वराळे (30), दीप सुनील कोंडेकर (23), प्रफुल्ल कमलाकर नेजदार (23, सर्व रा. कसबा बावडा), प्रवीण बाबुराव चौगुले (32, रा. शिये, ता. करवीर) यांना अटक करण्यात आली आहे; तर उर्वरित निशिकांत किसन कांबळे, धनाजी पांडुरंग गोडसे, प्रवीण विश्वास नेजदार, अजित विलास पवार, शिवाजी आंबी, अनंत श्रीहरी पाटील, प्रवीण बाबुराव वराळे (सर्व, रा. कसबा बावडा) यांचा शोध सुरू आहे. या गुन्ह्यात आणखी काही संशयितांची नावे निष्पन्न होण्याची शक्यता आहे.
चिटणीस यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, ‘राजाराम’च्या 7 महिन्यांपूर्वी झालेल्या निवडणुकीत विरोधी राजर्षी छत्रपती शाहू परिवर्तन आघाडीचा पराभव झाला. या पराभवास मीच कारणीभूत असल्याचा राग मनात धरूनच डॉ. संदीप नेजदार याच्यासह 13 जणांनी ठार मारण्याचा कट रचला होता. दि. 2 जानेवारीला कारखान्यातून बाहेर पडल्यानंतर बेडेकर बेकरीजवळ माझी मोटार येताच अडवून आपल्याला बाहेर ओढून मारहाण केली. गळ्यातील दोन तोळ्यांची चेन, रोख 1 हजार रुपये असा मुद्देमाल संशयितांनी लंपास केला.
याप्रकरणी पोलिसांनी जबाब नोंदवून बुधवारी पहाटे चारच्या सुमारास गुन्हा (case) दाखल केला. संशयितांची नावे निष्पन्न होताच त्यांचा शोध घेण्यात आला. यापैकी 8 जणांना अटक करण्यात आली. एकूण 15 जणांवरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक केलेल्या संशयितांना न्यायालयासमोर उभे केले असता सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली. शाहूपुरी पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक अजय सिंदकर, सहायक पोलिस निरीक्षक शीतलकुमार कोल्हाळ पुढील तपास करत आहेत.