कोल्हापूर जिल्ह्यासाठी कोठ्यावधींचा निधी मंजूर

जिल्ह्यात वारंवार उद्भवणार्‍या महापुरावर मात करण्यासाठी जलसंपदा विभागाने (Water Resources Department) तयार केलेल्या पूरनियंत्रण आराखड्यास जागतिक बँकेने मंजुरी दिली आहे. केंद्र सरकारने यापूर्वी प्राथमिक मंजुरी दिली आहे. 800 कोटी रुपयांच्या प्रस्तावानुसार, ‘डीपीआर’ बनविण्यासाठी पाच कोटी रुपयांचा निधी (funding) उपलब्ध केला आहे. लवकरच निविदा प्रक्रिया राबवून सविस्तर प्रकल्प अहवाल बनविण्यात येणार आहे.

जिल्ह्यात 1989, 2005, 2019 आणि 2021 या वर्षांत महापुराने मोठ्या प्रमाणात आर्थिक हानी झाली. यंदाचा अपवाद वगळता जिल्ह्यात पावसाचे प्रमाण चांगले आहे. पंचगंगा, दूधगंगा, वारणा, भोगावती या प्रमुख नद्यांसह अन्य नद्यांना येणार्‍या पुरांमुळे शहरात वारंवार पूरस्थिती निर्माण होते. कोल्हापूर इचलकरंजीसह शिरोळ तालुक्याला महापुराचा विळखा पडतो. महापुराची स्थिती उद्भवल्यामुळे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्ग आठवडाभर बंद ठेवावा लागतो. तसेच कोल्हापूर शहरात बहुतांश भागांत पुराचे पाणी शिरल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान होते. या सर्व पार्श्वभूमीवर महापुराचे नियंत्रण करण्यासाठी 800 कोटींचा आराखडा तयार करण्यात आला आहे.

त्याला मंजुरी मिळाल्याने महापूर नियंत्रणाची कामे मार्गी लागतील कोल्हापूर जलसंपदा विभागाने (Water Resources Department) 800 कोटी रुपयांचा आराखडा तयार केला आहे. अधीक्षक अभियंत्यांनी हा आराखडा मुख्य अभियंता कार्यालयात पाठविला. तेथून कार्यकारी संचालकांच्या मंजुरीने केंद्रीय जलआयोगाच्या मान्यतेसाठी पाठविण्यात आला. केंद्रीय जलआयोगाने या आराखड्यास मंजुरी दिली असून, तो केंद्र सरकारच्या अंतिम मंजुरीसाठी पाठविला होता. या आराखड्याच्या मान्यतेसाठी दिल्ली येथे दोन ते तीन बैठका झाल्या. जलसंपदा विभागाचे अप्पर मुख्य सचिव दीपक कपूर, कार्यकारी संचालक अतुल कपोले, मुख्य अभियंता एच. बी. गुणाले आणि कोल्हापूरचे अधीक्षक अभियंता अभिजित म्हेत्रे, कोल्हापूरचे तत्कालीन अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी सातत्याने पाठपुरावा करून या आराखड्यास मान्यता मिळविली आहे.

भोगावती ते दूधगंगा 6.4 कि.मी. बोगदा

या आराखड्यानुसार, पंचगंगा नदीवरील राजाराम आणि सुर्वे या बंधार्‍यांची पुनर्बांधणी केली जाणार असून, या ठिकाणी नव्या प्रस्तावानुसार बलून बंधारे बसविण्यात येणार आहेत. बलून बंधार्‍यांमुळे पावसाळ्यात बलूनमधील हवा सोडल्यानंतर पाणी प्रवाहित होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. तसेच महापुराच्या काळात भोगावती आणि दूधगंगा या दोन्ही नद्यांतील पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी भोगावती ते दूधगंगा असा 6.4 कि.मी. बोगदा बांधण्यात येणार आहे. या बोगद्यामुळे ज्या नदीस महापूर आहे तेथील पाणी पूर नसणार्‍या नदीत सोडण्याचे नियोजन करण्यात आले आहे. भोगावती नदीवरील सोन्याची शिरोली (तारळे बंधार्‍यामागे) ते दूधगंगा नदीवरील सरवडेपर्यंत बोगदा बांधण्यात येणार आहे.

याबरोबरच नदीतील गाळ काढण्यात येणार आहे. तसेच नदीची विविध ठिकाणी असणारी वळणे काढून नदीत प्रवाहात येणारे विविध अडथळे काढण्याचे कामही या आराखड्यात करण्यात येणार आहे. ऐतिहासिक राधानगरी धरणाचे स्वयंचलित दरवाजे बदलण्याचे कामही यामध्ये करण्यात येणार आहे. स्वयंचलित दरवाजांच्या ठिकाणी वक्राकार मॅन्युअल दरवाजे बसविण्यात येणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *