“हा तर सतेज पाटील यांचा रडीचा डाव”
महाविकास आघाडी सरकारच्या कालावधीमध्ये तत्कालीन पालकमंत्री सतेज पाटील यांनी विरोधकांना दहा टक्के सोडा दहा रुपये सुद्धा निधी (funding) दिला नाही. त्यामुळे निधी वाटपावरून त्यांनी जिल्हा नियोजन समितीवर टाकलेला बहिष्कार अयोग्य आहे, असा टोला भारतीय जनता पक्षाचे राज्यसभेचे खासदार धनंजय महाडिक यांनी आ. पाटील यांना लगावला.
जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीकडे काँग्रेसच्या आमदारांनी पाठ फिरवली. याबाबत खासदार महाडिक पत्रकारांशी बोलताना म्हणाले, सतेज पाटील रडीचा डाव खेळत आहे. ते लोकप्रतिनिधी आहेत. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीवर बहिष्कार टाकणे चुकीचे आहे. पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दहा टक्क्यांहून अधिक निधी दिला जाईल, असे सांगितले होते. दहा टक्के निधी म्हणजे कोट्यवधी रुपये होतो. मात्र, काँग्रेसच्या आमदारांना लोकांसमोर जायचं नाही लोकांची कामे करायची नाहीत म्हणून ते बहिष्कारची भाषा करत आहेत. सतेज पाटील हे पालकमंत्री असताना त्यांनी विरोधी सदस्यांना दहा टक्के निधी (funding) राहू दे, दहा रुपयेसुद्धा दिले नव्हते, असा टोला लगावला.
दरम्यान, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी पत्रकारांशी बोलताना म्हणाले, आ. पी.एन.पाटील हे संगमनेर येथे आहेत. त्यामुळे ते बैठकीला आले नाहीत. तर काही कामांमुळे या बैठकीला आपण हजर राहणार नाही, असे अगोदरच आ. सतेज पाटील यांनी सांगितले होते. त्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकलेला नाही, असे सांगितले.