कोल्हापूर सीपीआर आवारात धक्कादायक प्रकार

सुरक्षा पथकाला हिसडा मारून शिक्षा भोगणार्‍या नामचीन कैद्यांच्या (prisoners) पलायनाचा थरार तसा नवा नाही. फाजिल आत्मविश्वास सुरक्षा रक्षकांसह वरिष्ठांनाही नडत असल्याची अनेक उदाहरणे असताना गुरुवारी जेलमध्ये शिक्षा भोगणारा अन् हातात बेड्या ठोकलेला चाळीस वर्षीय कैदी सीपीआरमध्ये एकटाच निवांत बसला होता. जणू तो सीपीआरचा चौकीदार आहे. सोबत असणारा सुरक्षारक्षक काही अंतरावर गप्पा मारत असल्याचे धक्कादायक चित्र पाहायला मिळाले. अनेक वेळ गप्पांत दंग असणारे पोलिस कर्मचारी अन् कैद्यांचा असा मुक्त संचार असे चित्र सीपीआरमध्ये पाहायला मिळते.

कळंबा कारागृह अथवा बिंदू चौकातील जिल्हा कारागृहातील कैद्यांना वैद्यकीय तपासणी अथवा उपचारासाठी शासकीय (सीपीआर) रुग्णालयात आणले जाते. कैद्यांवर प्रतिस्पर्धी टोळ्यांकडून हल्ले-प्रतिहल्ले होऊ नये अथवा सुरक्षा पथकांवर हल्ला करून न्यायाधीन बंदींनी पलायन करू नये, याची कारागृह प्रशासनासह पोलिस यंत्रणांकडूनही खबरदारी घेतली जाते. न्यायालयीन कामकाजासाठी अथवा उपचारासाठी रुग्णालयाकडे हलविण्यापूर्वी कडेकोट बंदोबस्ताचे नियोजन करून कैद्यांना कारागृहातून बाहेर काढले जाते.

रक्षकासमोर भागविली तंबाखूची तलफ !

गुरुवारी कळंबा जेलमध्ये कारावास भोगणार्‍या काही कैद्यांना (prisoners) वैद्यकीय उपचारासाठी सीपीआरमध्ये व्हॅनमधून आणण्यात आले होते. त्यांच्या दिमतीला बंदोबस्तासाठी पुरेसा फौजफाटाही होता. वैद्यकीय तपासणीनंतर काही कैदी व्हॅनच्या दिशेने स्वत: जात होते; तर काही कैद्यांची प्रवेशद्वारालगत कट्ट्यावर बसून हातावर तंबाखू-चुना घेऊन मळणी सुरू होती. काहींचा तर बंदोबस्ताशिवाय मुक्त संचार सुरू होता.

जवानासमोरच कैद्याला पाण्याची बाटली

कट्ट्यावर बसलेेल्या कैद्याच्या देखभालीसाठी नियुक्त जवान 15 ते 17 फूट अंतरावर मित्रासमवेत गप्पांत रमला होता. एकाने तर कैद्याला पाण्याची बाटली दिली. सुरक्षा पथकातील अनेक जवान झाडाखालच्या हॉटेलमध्ये गप्पांत रमले होते.

प्रभारींची बदली तर तिघांचे निलंबन

इचलकरंजी येथील जर्मनी टोळीला न्यायालयात नेण्यात येत असताना म्होरक्याला कीटकनाशक पदार्थ पुरविले. संशयितांनी आत्महत्येचा प्रयत्न केला. या प्रकरणाला जबाबदार धरून प्रभारींची बदली आणि तीन पोलिसांना निलंबनाला सामोरे जावे लागले.

सुरक्षा यंत्रणेची लक्तरे वेशीवर !

कैद्यांना कारागृहातून बाहेर हलविणे अथवा सुरक्षित परत आणण्याची जबाबदारी अत्यंत जिकिरीची असतानाही सुरक्षा पथकांची बेपर्वाई कधी कधी त्यांच्याच अंगलट येते. गुरुवारी दुपारी शासकीय रुग्णालय आवारात कोल्हापूरकरांच्या नजरेला जो प्रकार अनुभवाला आला, तो निश्चित धक्कादायक; शिवाय सुरक्षा यंत्रणेची लक्तरे वेशीवर टांगणारा होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *