सीपीआर आवारात पोलिस यंत्रणेची उडाली तारांबळ
(crime news) शासकीय (सीपीआर) रुग्णालय आवारात रुग्णांसह नातेवाईकांची सतत वर्दळ असलेल्या दूधगंगा इमारतीसमोर बेवारस स्थितीत धारदार तलवारीसह दुचाकी आढळल्याने पोलिस यंत्रणेची तारांबळ उडाली. या घटनेनंतर खबरदारी म्हणून पोलिसांचा फौजफाटा पाचारण करण्यात आला. रात्री उशिरा कोडोली (ता. पन्हाळा) येथील दोन तरुणांना चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे.
संशयित तरुणांनी धारदार तलवार रुग्णालय आवारात कोणत्या कारणासाठी आणली होती. पांढर्या रंगाच्या पिशवीतगुंडाळून तलवार दुचाकीवर ठेवण्याचा हेतू काय, याचीही सखोल चौकशी सुरू आहे. रुग्णालय परिसरात दहशत माजविण्याचा तरुणांचा हेतू असावा का, याचीही माहिती घेण्यात येत आहे, असे लक्ष्मीपुरी पोलिस ठाण्याचे निरीक्षक अरविंद कवठेकर यांनी सांगितले.
दूधगंगा इमारतीसमोर पार्किंग केलेल्या दुचाकीवर पिशवीत गुंडाळून धारदार तलवार बेवारस स्थितीत ठेवण्यात आल्याचे नागरिकांच्या निदर्शनास आले. सुरक्षा रक्षकांना घटनेची माहिती देण्यात आली. रक्षकांनी तलवारीसह दुचाकी ताब्यात घेऊन लक्ष्मीपुरी पोलिसांना खबर दिली. पोलिस अधिकारी कुमठेकर, उपनिरीक्षक भगवान गिरी, हवालदार संजय कोळी घटनास्थळी दाखल झाले. शासकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. प्रकाश गुरव यांची भेट घेऊन चर्चा केली. (crime news)
परिसरातील सीसीटीव्ही फुटेजचीही पाहणी करण्यात आली. मात्र, पोलिसांना सुगावा लागत नव्हता. अखेर दुचाकीच्या क्रमांकावरून वाहनमालकाचे नाव निष्पन्न झाले. पोलिसांनी त्याच्याशी संपर्क साधला. तरुणांनीही धारदार तलवार पिशवीत गुंडाळून दुचाकीवर ठेवल्याची कबुली दिली असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत त्याच्याकडे चौकशी करण्यात येत होती.