कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला मिळणार चालना
प्रस्तावित नागपूर-गोवा ‘भक्ती मार्गा’त कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई, दख्खनचा राजा श्री जोतिबासोबतच आता आदमापूर येथील श्री बाळूमामा मंदिराचाही समावेश होणार आहे. दरम्यान, कोल्हापूर जिल्ह्याच्या पर्यटन विकासाला (Tourism development) चालना देणार्या या बहुचर्चित ‘भक्ती मार्गा’च्या कामाची अधिसूचना तत्काळ प्रसिद्ध करा, असे आदेश उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यकारी संचालकांना दिले.
सह्याद्री अतिथीगृहावर या प्रकल्पाबाबत झालेल्या आढावा बैठकीत हे आदेश दिल्याचे आ. प्रकाश आबिटकर यांनी बैठकीनंतर सांगितले. पुणे-मुंबई एक्स्प्रेस वेच्या धर्तीवर नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाप्रमाणे नागपूर-गोवा भक्ती मार्गाची राज्य शासनाने घोषणा केली होती. सुमारे 800 किमी लांबीचा हा सहा पदरी रस्ता महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाडून करण्यात येणार आहे. या महामार्गावर राज्यातील 20 मोठ्या धार्मिक स्थळांचा समावेश असेल.
कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिर आणि दख्खनचा राजा श्री जोतिबा या देवस्थानांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये आता आदमापूर येथील श्री सद्गुरू बाळूमामा देवस्थानचा समावेश करण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे करण्यात आली होती. यावर प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना मुख्यमंत्री शिंदे यांनी दिल्या होत्या. त्यामुळे या महामार्गात श्री बाळूमामा देवस्थानचाही समावेश होणार असल्याचे आबिटकर यांनी सांगितले.
पर्यटनाला चालना मिळणार
राधानगरी-दाजीपूर अभयारण्यात मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असतात. या महामार्गाला दाजीपूर अभयारण्यही जोडले जाणार असून अभयारण्यापासून 25 किलोमीटर अंतरावरून हा मार्ग जाणार आहे. यामुळे पर्यटकांची संख्याही वाढण्यास मदत होणार आहे. (Tourism development)
समृद्धीच्या धर्तीवर ‘ग्रीन फिल्ड’ मार्ग
समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरच हा मार्ग संपूर्ण ग्रीन फिल्ड असणार आहे. हा मार्ग कोणत्याही शहरातून तसेच गावातून जाणार नाही. शहर, गावापासून किमान तीन ते चार किलोमीटर दूरवरून हा मार्ग जाणार आहे. जी धार्मिक स्थळे या महामार्गाशी जोडली जाणार आहेत, त्यासाठी महामार्ग ते धार्मिक स्थळ असाही रस्ता होणार आहे.
सप्टेंबरपर्यंत प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होण्याची शक्यता
या बैठकीत या महामार्गाला गती देण्याच्या सूचना देण्यात आल्या. याकरिता अधिसूचना, सर्वेक्षण, प्रकल्प अहवाल आदीकरिता कालबद्ध कार्यक्रम निश्चित केला जाणार असून या मार्गाच्या प्रत्यक्ष कामाला सप्टेंबरपर्यंत सुरुवात करता येईल, यादृष्टीने राज्य शासनाने तयारी सुरू केली आहे.